पारधी पिढी जात पंचायतीच्या बळी प्रकरणी ढोकीतील दोघांना अटक 

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ४० जणांविरुद्ध  गुन्हा दाखल
 
s

उस्मानाबाद  - जात पंचायतीचा भयानक त्रास सहन न झाल्याने शहरातील पारधी समाजातील  एका तरुण पती-पत्नीने विष प्राशन केले होते. यापैकी पतीची १४ व्या दिवशी प्राणज्योत मालवली होती.  संबंधित जात पंचायतीच्या तथाकथित पुढाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह प्रेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता.   याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  जवळपास १० ते १२ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व ह. मु. काका नगर उस्मानाबाद येथे राहणारे सोमनाथ छगन काळे यांचे त्यांच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरवून सोमनाथ यास २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड देखील वसूल केले. मात्र उर्वरित १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे सतत तगादा लावला. विशेष म्हणजे जर तू पैसे देण्यास विलंब केलास तर तुझ्या वहिनीला नग्न करुन पंचासमक्ष तिच्यावर बलात्कार करण्यात येईल. तर तुझ्या डोक्यावर ५० किलो वजनाचा दगड ठेवण्यात येईल. उकळत्या तेलात तापविलेली कुऱ्हाड हातावर घ्यावी लागेल, आगी मोहोळाचा मध काढावे लागेल याबरोबरच मानवाची विष्टा देखील खावी लागेल. इतकेच नव्हे तर सोमनाथ यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

सतत दिल्या जाणाऱ्या व होत असलेल्या या जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ व त्यांची पत्नी अनिता यांनी दि.२२ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना रूग्णालयात दाखल केले. यापैकी सोमनाथ यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. या दरम्यान अनिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र दि.५ ऑक्टोबर रोजी सोमनाथ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी जात पंचायतीचे म्होरके असलेल्या पुढारी यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रेतासह नातेवाईकांनी आक्रोश केला होता. 

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

  राजा चव्हाण, मोतीराम काळे, भागवत पवार, पापा शिंदे, रामदास चव्हाण, नामदेव काळे, जगु काळे, कालीदास काळे, बजरंग चव्हाण, बप्पा चव्हाण, दादा चव्हाण, संजय काळे, सुभाष काळे, बापु काळे, अनिल काळे, बप्पा काळे, शहाजी पवार, अरुण काळे, दादा शिंदे, रवि शिंदे, महादेव काळे, वसंत काळे, संतोष काळे, दिगंबर शिंदे यांसह अन्य 15 व्यक्ती यांनी दि. 18.09.2021 रोजी 14.00 वा. सु. सांजा येथे जातपंचायत मध्ये ठोठावलेला दंड न भरल्याच्या कारणावरुन सोमनाथ छगन काळे व सुनिता काळे, दोघे रा. पळसप, ता. उस्मानाबाद (ह.मु. गोरोबाकाका नगर, उस्मानाबाद) या दोघा पती- पत्नींस समाजातून वाळीत टाकले. तसेच त्यांची जमीन ताब्यात घेउन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन गावातून हाकलून दिले व जातपंचायतीने ठोठावलेली दंडाची रक्कम न भरल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे नमूद लोकांच्या त्रासास कंटाळून सोमनाथ व सुनिता या दोघा पती- पत्नींनी विषारी औषध प्राशन केले असता सोमनाथ काळे यांचा शासकीय रुग्णालय, सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.अशा मजकुराच्या सुनिता यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 297, 268, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासुन व्यक्तींचे संरक्षण अधिनियम कलम- 5, 6, 7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पैकी कालिदास महादू काळे वय ७०, दादा उद्धव चव्हाण वय ३० दोघे रा. राजेशनगर, पारधी पिढी, ढोकी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक घाडगे  यांच्या मार्गदर्शना खाली, सपोनि शैलेश पवार, पोहेकॉ  प्रदीप  ठाकूर , पोहेकॉ शिवाजी शेळके , पोना दिपक लाव्हरे पाटील , पोकाॅ  गणेश सर्जे , पोकाॅ  योगेश कोळी, चापोकाॅ  गोरे यांनी ही कारवाई केली. 

From around the web