येडशीत डॉक्टरांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

 नऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास 
 
Osmanabad police

येडशी - येडशीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे.  येथील डॉ. विद्या सतीश जेवे यांच्या घरी रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी दरवाजाची जाळी तोडून ९ लाख १६ हजारांचा डल्ला मारला. विशेष म्हणजे चोरटे सीसीटिव्हीचे फुटेज डिलिट करुन पसार झाले. तसेच शेजारच्या मेडिकलचाही कॅमेरा फिरवल्याचा प्रकार  घडला  आहे. 

डॉ. जेवे यांचे गणेश नगर भागात धन्वंतरी क्लिनिक आहे. तेथेच जेवे राहतात. रात्री परिवार झोपला असताना दोन अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची अगोदर जाळी तोडली. त्यानंतर दरवाजाचा आतील लॉक तोडले. चाकू व रॉड हातात घेऊन चोरटे डॉ. विद्या जेवे यांच्या रुममध्ये शिरले. त्यांनी तुम्हाला काही करणार नाही पैसे व सोने कुठे ठेवले ते सांगा आणि चाव्या द्या, अशी धमकी वजा सूचना केली. 

अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी कपाटात सर्व साहित्य असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सहा लाख रोख रक्कम आणि तीन लाख सहा हजार रुपये किंमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने घेतले. तसेच रुग्णालयातील काऊंटरमध्ये असलेले दहा हजार रुपये असे एकूण नऊ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज व रोख चोरुन नेला. 

जाताना चोरांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज ही डिलीट केले. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, डी. वाय. एस. पी. अंजुम शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र, फारशी माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी डॉ. विद्या सतीश जेवे यांच्या फिर्यादीवरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास शिंदे हे करत आहेत.
 

From around the web