बार्शी तालुक्यातील जवानाची धाराशिवमध्ये आत्महत्या
धाराशिव : धाराशिव शहरातील शिक्षक कॉलनी येथे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्समध्ये (एमएसएफ) भरती होऊन ट्रेनिंग घेऊन आलेल्या जवानाने दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमचंद उद्धव वाघ (वय २८) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ही घटना १३ जून रोजी घडली. या प्रकरणी बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील महिला व पुरूष अशा दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारीवाडी, ता. बार्शी येथील- प्रेमचंद उध्दव वाघ, वय 28 वर्षे, यांनी दि. 13.06.2023 रोजी 14.00 ते 17.30 शिक्षक कॉलनी, धाराशिव येथे गळफास घेउन आत्महत्या केली. सुर्डी, ता. बार्शी येथील- मनिषा शंकर शिंदे,योगेश चंगदाळे या दोघांनी प्रेमचंद यास सतत ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्याचे कारणावरुन त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून प्रेमचंद यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- गोविंद उध्दव वाघ यांनी दि. 14.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारीवाडी ता. बार्शी येथील प्रेमचंद उद्धव वाघ (वय २८) हे गेल्या काही वर्षापासून भाड्याने रूम घेऊन धाराशिव शहरातील शिक्षक कॉलनी येथे रहात होते. त्यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणा-या अॅकॅडमीसाठी धाराशिव येथे रूम भाड्याने घेतली होती. ते जिद्द व कष्टाच्या जोरावर दोन वर्षापुर्वी महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्समध्ये (एमएसएफ) भरती झाले होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिड वर्षाचे ट्रेनिंग घेऊन परत धाराशिव येथे आले होते.
दरम्यानच्या काळात त्यांची बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील मनिषा शंकर शिंदे व योगेश चंगदाळे यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी प्रेमचंद वाघ यांना ब्लॅकमेल करून सतत पैशाची मागणी करीत होते. हे दोघेही पैसे न दिल्यास तुझी नोकरी घालवितो, अशी धमकी देत होते. मनिषा शिंदे व योगेश चंगदाळे या दोघांनी सतत दिलेल्या त्रासामुळे व जाचास कंटाळून प्रेमचंद वाघ यांनी १३ जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास भाड्याच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रेमचंद वाघ यांचे भाऊ गोविंद उध्दव वाघ यांनी दि. १४ जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३०६, ३४ अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक करीत आहेत.
मयत प्रेमचंद हा शेतकरी कुटुंबातील आहे. गोविंद व प्रेमदंच हे दोघे भाऊ आहेत. प्रेमचंद हा अविवाहित असून तो नुकताच महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्समध्ये भरती झाला होता. तो ट्रेनिंगही करून आला होता. अशातच त्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या करून जीवन संपविले आहे.