बार्शीत राज्य राखीव दलातील पोलिसाचा गोळीबार 

कळंब तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू 
 
Osmanabad police

बार्शी  -  राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलिसाने स्वत:जवळील पिस्तुलातून गोळीबार केल्यामुळे सापनाई (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील एकाचा मृत्यू झाला, तर पोलिसाचा चुलतभाऊ आणि अन्य दोघे असे एकूण तीनजण जखमी झाले.  भातंबरे (ता. बार्शी) येथे बुधवारी (दि. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. नितीन भोसकर असे मृताचे नाव असून, ते आरोपीच्या मेव्हण्याचे मित्र होते. गोळी त्यांच्या पोटात लागली. जखमींमध्ये आरोपीच्या चुलतभावाचाही समावेश आहे. वैराग (ता. बार्शी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमींवर उस्मानाबाद आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले, की राज्य राखीव पोलिस दलातील गुरुबा महात्मे याचे पाच वर्षांपूर्वी सापनाई (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील जालिंदर काकडे यांच्या मुलीशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. महात्मे हा मुंबई येथे कार्यरत आहे. चारित्र्याच्या संशयावरून काही दिवसांपासून त्याचे आपल्या पत्नीशी सतत भांडण व्हायचे. घटनेदिवशीही भांडणानंतर आरोपीच्या पत्नीने वडिलांना फोन करून माहिती दिली. रात्री नऊच्या सुमाराला आरोपीचे मेव्हणे अमर काकडे व त्यांचे मित्र नितीन भोसकर, काशीनाथ काळे (सर्व रा. सापनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) हे तिघे आरोपीच्या पत्नीस माहेरी घेऊन जाण्यासाठी आले होते. या दरम्यान गावातील प्रमोद वाघमोडे व सासू, सासरे, दीर यांच्यासमोर भांडण मिटविण्यासाठी चर्चा सुरू होती. तणाव वाढत गेला. तेव्हा अमर काकडे यांनी आपल्या बहिणीस, ‘मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुझी बॅग भर,’ असे सांगितले.

त्यामुळे चिडलेल्या गुरुबा महात्मे याने स्वत:च्या कमरेची पिस्तूल काढून चार वेळा गोळीबार केला. या गोळीबारात काकडे यांचे मित्र नितीन भोसकर हे गंभीर जखमी झाले. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाद मिटवण्यासाठी आलेले गुरूबाचे चुलतभाऊ बालाजी महात्मे (रा. भातंबरे), अमर काकडे आणि त्यांचे मित्र काशीनाथ काळे (दघेही रा. सापनाई, ता. कळंब) जखमी झाले. गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. जालिंदर काळे पळून जात असताना त्यांच्यावरही आरोपीने गोळीबार केला. नेम चुकल्याने ते थोडक्यात बचावले. जखमी काकडे, काळे यांच्यावर उस्मानाबाद येथे, महात्मे याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

पोलिस निरीक्षक विनय बहीर, सहायक पोलिस निरीक्षक महारूद्र परजणे यांनी घटनास्थळावरून गुरुबा महात्मे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व २६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीला बार्शी सत्र न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनेनंतर संशयित आरोपी गुरूबा महात्मे याला पिस्तूल आणि काडतुसासह अटक करण्यात आली आहे. तो सध्या एसआरपीएफच्या विशेष सुरक्षा विभागात प्रतिनियुक्तीवर आहे. या शाखेअंतर्गत अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) सुरक्षेसाठी नियुक्ती असते. आरोपीने पिस्तुल आॅनड्यूटी आणले की तो रजेवर आहे, हे तपासाअंती समजेल. शासकीय शस्त्राचा त्याच्याकडून गैरवापर झाला आहे.

From around the web