लोहगाव खून प्रकरणी मुख्य आरोपीला  नळदुर्ग पोलिसांचे अभय 

मागील अनेक प्रकरणात पोलिसांची तोडपाणी 
 
crime

नळदुर्ग  :  तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे एका तरुणाचा शेतीच्या वादातून भावकीतील चार जणांनी निर्घृण खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीला 'अभय' दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. हा आरोपी शिक्षक असल्याने मोठी तोडपाणी झाल्याचे समजते. तसेच मागील अनेक प्रकरणात पोलिसांनी हात ओले केल्याची चर्चा सुरु आहे. 

लोहगाव, ता. तुळजापूर येथील-शंकर काटकर, नागनाथ काटकर, सचिन काटकर, यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन दि.28.06.2023 रोजी 23.00 ते दि.29.06.2023 रोजी 07.00 वा. सु. लोहगाव शिवारातील शेतात गावकरी-अमोल शिवाजी काटकर, वय 32 वर्षे यांना मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाउ  संतोष शिवाजी काटकर यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुख्य आरोपीला अभय 
लोहगावमध्ये   झालेल्या अमोल शिवाजी काटकर ( वय 32 ) खूनप्रकरणी शंकर काटकर, नागनाथ काटकर, सचिन काटकर यांच्यावर  भा.दं.सं. कलम- 302, 34  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु एका मुख्य आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नाही. हा आरोपी शिक्षक असल्याची चर्चा सुरु असून, याप्रकरणी मोठी तोडपाणी झाल्याचे समजते. हा खून २८ जून रोजी झाला होता आणि गुन्हा ३० जून रोजी दाखल करण्यात आला. याचा अर्थ पाणी कुठं तरी मुरत आहे, असा संशय येत आहे. २४ तासात खुनाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास वेळ का लावला ? हे एक कोडेच आहे. 

या खून प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून, मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल  करावा तसेच आरोपीला अभय देणाऱ्या पोलिसाना याप्रकरणी सह आरोपी करावे, अशी मागणी होत आहे. 

अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी नळदुर्ग पोलिसांची तोडपाणी 

नळदुर्ग - अल्पवयीन  मुलीच्या विवाह प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल न करता, तोडपाणी करून प्रकरण आपसात मिटवल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. 

नळदुर्गच्या एका मुलाने मागील महिन्यात १७ वर्षाच्या मुलीबरोबर लग्न केले होते. हे प्रकरण काही सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नळदुर्ग पोलिसांना समजताच, गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रकरण साखरपूडा दाखवून आपसात मिटवण्यात आले. वास्तविक १७ वर्षाच्या मुलीबरोबर साखरपुडा करता येतो का ? हे एक कोडेच आहे. 

अणदूर विनयभंग प्रकरणी बोटचेपेपणा 

अणदूर येथील एका गुन्हेगारी प्रवूतीच्या तरुणाने एका दलित विधवा महिलेच्या घरी रात्री दीड वाजता जाऊन वाईट हेतूने दाराची कडी वाजवली. यावेळी सदर महिलेने आरडाओरड करताच, आजूबाजूच्या तरुणांनी या नराधमास बदडून नळदुर्ग पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी विनयभंग आणि ऍट्रॉसिटी ही कलमे लावण्याऐवजी किरकोळ कलमे लावून, तोडपाणी करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. 

सामाजिक तेढ निर्मण करणारा आरोपी मोकाट 

नळदुर्गमध्ये काही दिवसापूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या दोन्ही गटातील लोकांवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला होता. त्यानंतर  दोन्ही गटातील काही लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी फरार झाला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून देखील पोलीस त्यास पोलीस अटक करीत नाहीत. हा आरोपी 'शाहीन' मारत गावात मोकाट आणि उजळ माथ्याने फिरत असताना, पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. 

From around the web