आई तुळजाभवानीच्या दान पेटीवर दरोडा घालणाऱ्या नाईकवाडी यास सहा दिवसाची पोलीस कोठडी 

 
s

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दान पेटीवर दरोडा घालणारा तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यास गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर पोलिसांनी  गजाआड केले आहे. हा आरोपी शहरात वर्षभर उजळ माथ्याने फिरत असताना, पोलीस अटक करीत नव्हते, मात्र एसपीची बदली होताच पोलिसांना जाग आली आणि रविवारी मध्यरात्री त्याच्या राहत्या घरी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, नाईकवाडी यास न्यायालयात उभे करण्यात आले असता, सहा दिवसाची म्हणजे २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 तुळजाभवानी मंदिर समितीचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी  यांनी ऐतिहासिक प्राचीन नाणी, 348 ग्रॅम सोने तसेच चांदीचा अपहार केला होता. या संदर्भात येथील तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे वकील अॅड शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत लेखी तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे केली होती. या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती. 

त्यानंतर पोलिसांत 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 मे 2019 रोजी लेखी तक्रार केली होती. नाईकवाडी हे कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कारकिर्दीत नाईकवाडी यांनी ऐतिहासिक नाणे तसेच सोन्या चांदीच्या वस्तु गायब केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गुन्हा दाखल झाल्यानंतर भामट्या आरोपीस तात्काळ अटक करणारे पोलीस दिलीप नाईकवाडी यास अटक करण्यासाठी धजावत नव्हते. नाईकवाडी यास उच्च न्यायालयातून अटकपूर्वक जामीन आणण्यास मदत केली पण न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी नाईलाजाने एक वर्षानंतर नाईकवाडी यास अटक केली. एसपी राजतिलक रौशनी यांची बदली झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे, हे विशेष. 

दरम्यान, नाईकवाडी यास न्यायालयात उभे करण्यात आले असता, सहा दिवसाची म्हणजे २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलीस कोठडीत पोलीसनाईकवाडी यास कोणत्यी वागणूक देणार ? सखोल तपास करून अन्य आरोपी अटक करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

काय आहे प्रकरण 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील  सोन्या चांदीचे दागिने तसेच ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती.

मौल्यवान दागिन्यांच्या या चोरी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांच्यावर अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात नोंदविण्यात आला नव्हता. गुरुवार १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुक दिवेगावकर यांनी शासनाच्या आदेशानुसार याप्रकरणी दिलिप नाईकवाडी याच्यावर मौल्यवान व ऐतिहासीक दागिन्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंदिर समितीचे विश्वस्त तथा तुळजापूर तहसीलदार यांना दिले . 


 
तुळजाभवानी मातेला निझाम ,औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व  २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी   तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.

मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या मात्र यापैकी तीन चाव्या हरवल्या आहेत. देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत. यातील चौथ्या पेटीत अकरा दागिन्यांची नोंद होती, ज्यात चांदीच्या पादुका गायब असल्याचं आढळलं. पाचव्या पेटीतील अलंकारही पळवून नेले असल्याचे आढळून आले. 


 

From around the web