मनीषा राखुंडे - पाटील यांच्यावर खुनी हल्ला 

आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी
 
s

उस्मानाबाद -राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा राखुंडे - पाटील यांच्यावर राहत्या घरात  घुसून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याच्या घटनेचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात महिला असुरक्षित असल्याचे दिसत असून या घटनेतील हल्लेखोराला तात्काळ अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.16) जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा पाटील यांच्यावर राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनीषा पाटील यांची भेट घेऊन धीर दिला. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लहुजी शक्ती सेना खंबीरपणे पाठीशी राहील असे आश्वासित केले. 


उस्मानाबादसारख्या शहरात महिलावर चाकूहल्ला होत असेल तर महिला असुरक्षित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर लहुजी शक्ती सेनेेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, संपर्कप्रमुख निखिल चांदणे, युवा नेते मुकेश शिंदे, शहराध्यक्ष पृथ्वीराज देडे, विद्यार्थी आघाडीचे कार्याध्यक्ष अजय पेठे यांची स्वाक्षरी आहे. 

आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद 

मनीषा राखुंडे - पाटील यांच्यावर खुनी हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, या आरोपीस तात्काळ अटक करून, यामागे कुणाचे षडयंत्र आहे, हे शोधून काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 
 

From around the web