कळंब तालुक्यात अनैतिक संबंधातून एकाचा खून

महिलेसह तिघांना अटक 
 
Osmanabad police

कळंब -  कळंब तालुक्यात अनैतिक संबंधातून एकाचा खून झाला असून याप्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील कन्हेरवाडी येथील एका महिलेने अनैतिक संबंधातून रत्नापूर येथील एकाच्या डोक्यात दगड घालुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

२७ सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील इटकुर येथील पारा रस्त्यावरील वाशीरा नदीत वाहत्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ घटनास्थळी पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी धाव घेतली होती. त्यानंतर इटकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेहाची ओळख न पटल्यामुळे पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करून आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली होती. १३ ऑक्टोबर रोजी मृत फुलचंद निकम यांचा मुलगा गौरव निकम यांनी वडील गायब झाल्याचा संशय व्यक्त करून कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

उपविभागीय पोलिस अधिकारी बी रमेश, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांनी तपासाची चक्रे फिरवत असता, अनैतिक संबंधातून खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हाच धागा धरत पोलिसांना खुनाचे गुढ उकलण्यास यश आले आहे. रत्नापुर येथील फुलचंद निकम जनावरांच्या दवाखन्यात नोकरीस असून २५ सप्टेंबर रोजी कन्हेरवाडी येथे आल्यावर सचिन दत्ता कवडे दुचाकीवरून कन्हेरवाडी येथील घरी घेऊन गेले. एक महिलेचे फुलचंद निकम यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याच रात्री या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले, रागाच्या भरात निकम यांच्या डोक्यात दगड घातला असता त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दिवसभर मृतदेह घरात ठेऊन २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री मृतदेह पती दत्ता कवडे, मुलगा सचिन कवडे यांनी दुचाकीवर टाकून इटकुर येथील पारा रस्त्यावरील वाशीरा नदीत फेकुन दिली. खून झाल्याने पोलिसांनी व्यक्तीचे मोबाइल कॉलची माहिती व लोकेशन मिळवले. त्यावरून गुन्हा दाखल झाला. 

त्यानुसार १३ ऑक्टोबर रोजी कन्हेरवाडी येथील एक महिला, दत्ता कवडे, सचिन कवडे यांना अटक केली असून न्यायालयासमोर दोन वेळा हजर करून २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान महिलेने खुनाची कबुली दिली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा उघड झाला आहे.तपासकामात पोलिस नाईक गणेश वाघमोडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल तांबडे, पोपट जाधव, प्रशांत राऊत यांनी काम पाहिले.
 

From around the web