उस्मानाबादेत वकिलावर मेव्हुण्याचा भ्याड हल्ला

 
d

 उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम छोटेखानी साजरा कृरण्याची विनंती करणार्‍या वकिलाला मेव्हुण्याने त्याला तीव्र विरोध करत रात्री उशीरा घरात घुसून फायटरने मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना बालाजीनगर भागात शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी जखमी वकिलाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विकास सूर्यभान नेलवाडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील बालाजीनगर येथील रहिवाशी अ‍ॅड. प्रवीण रामचंद्र पाटील यांची पत्नी तनुजा पाटील पाच महिन्यांची गर्भवती आहे. त्याअनुषंगाने सासरी परंपरेनुसार साजरा करावयाचा चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आयोजित करण्याचा हट्ट अ‍ॅड. पाटील यांच्या सासू-सासरे व मेव्हुण्याचा होता. शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाबाबत फोनवर चर्चा करताना अ‍ॅड. प्रवीण पाटील यांनी सासरच्या मंडळींना सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. 

निर्बंधही कडक लागू आहेत. त्यामुळे मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्याऐवजी घरातल्या घरात, जवळच्या नातलगांना बोलावून कार्यक्रम आटोपण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. त्यावर सासू सविता उर्फ वत्सला नेलवाडे व मेव्हुणा विकास नेलवाडे (रा. कोंडजीगड, ता. लोहारा) यांनी अर्वाच्च भाषा वापरत छोटा कार्यक्रमाच्या आयोजनास विरोध केला. विकास नेलवाडे याने फोनवर धमकी देवून रात्री 11.17 वाजण्याच्या सुमारास अ‍ॅड. पाटील यांच्या घरी येवून त्यांना व त्यांचे वडील रामचंद्र पाटील यांना मारहाण केली. फायटरने मारहाण झाल्याने अ‍ॅड. प्रवीण पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विकास नेलवाडे याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात भादंविचे कलम 323, 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

From around the web