कळंब : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी 

 
court

कळंब -  एका भटकंती करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर ओळखीचा फायदा घेत एका नराधमाने लैंगीक अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोपीस कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.के. राजेभोसले यांनी २० वर्षाचा ससक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा  ठोठावली आहे. 


या खटल्याची पार्शभूमी अशी की , दि.४ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर प्रकरणातील पिडीत मुलीच्या आईने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे त्यांची मुलगी ऍडमीट असताना फिर्याद दिली की, मागील ६ महिन्यांपासून ते कळंब तालुक्यातील एका गावात विहीरीच्या कामानिमित्त मजुरीने फिर्यादी आई व तिची अल्पवयीन मुलगी आणि परिवार उपजिवीकेसाठी वास्तव्यास होते. दरम्यानच्या काळामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणारा सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे, रा. उमराव देशमुख ता. मेहकल, जि. बुलढाणा हा त्यांच्या घरी नेहमी येत जात असे. त्यांने त्याच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन फिर्यादीची अल्पवयीन मुली सोबत वारंवार शारिरीक संबंध केले. त्यामुळे ती मुलगी गर्भवती झाली असे सांगून आरोपी सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे याच्या विरुध्द तक्रार दिली. 

या तक्रारीवरून  पोलीस स्टेशन कळंब येथे गु.र.नं. ५४ / २०२१ नुसार भादंविचे कलम ३७६ (२) (जे) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम ४ नुसार आरोपी सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणांचा तपास सपोनि चैनसिंग गुसींगे यांनी करून तपासाअंती आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगताप यांच्या न्यायालयासमोर झाली. या प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून सचिन एस. सुर्यवंशी यांनी काम पाहिले. हे प्रकरण प्रलंबित असताना कळंब येथे अति. जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन झाल्याने ते प्रकरण कळंब येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.के. राजेभोसले यांच्या न्यायालयात वर्ग झाले. त्यानंतर या प्रकरणात अति. शासकीय अभियोक्ता अशिष एस. कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार एस.व्ही. माळी व पोलीस अंमलदार बी.पी.शिंदे यांनी काम पाहिले. या प्रकरणात पिडीतेच्या गर्भाचा अंश, पिडीता व आरोपी यांच्या डी.एन.ए. नमुन्याच्या अहवालानुसार या गर्भाच्या अंशाचे जनुकीय माता ही पिडीता असून जनुकीय पिता आरोपी असल्याचे सिध्द झाले होते.

या प्रकरणात अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व डी.एन.ए. अभिप्राय देणारे रासायनिक विश्लेषक यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. या प्रकरणाचे वैशिष्ठ म्हणजे पिडीता व पिडीताचे कुटू़ब हे गावोगावी फिरून घिसाडी काम करणारे मजुर असल्याने पिडीतेच्या जन्माची नोंद कोठेही नव्हती. तसेच पिडीता ही कधीही शाळेत गेलेली नव्हती. परंतू अंबाजोगाई येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वयाबाबतचा अहवालाचा व पिडीता व पिडीताच्या आईने सांगितलेल्या वयावरून पिडीता ही अल्पवयीन असल्याचे मत न्यायालयाचे झाले. 

 या प्रकरणात आलेला ठोस पुरावा तसेच पिडीतेचा वैद्यकीय तपासणी अहवाल, डी.एन. ए. अहवाल ग्राह्य धरुन कळंब येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.के. राजेभोसले यांनी आरोपीस भारतीय दंड विधान कलम ३७६ (३), ३७६ (२) (जे) (एन) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम चे कलम ४ व ६ नुसार आरोपी सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे याला दोषी धरुन भारतीय दंड विधान ३७६ (३) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम चे कलम ४ अंतर्गत २० वर्षाची सक्तमजुरी व २५ हजार रुपये द्रव्यदंड तर ३७६ (२) (जे) (एन) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम ६ अंतर्गत २० वर्षाची सक्तमजुरी व २५ हजार रुपये द्रव्यदंड शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीने एकत्रीत भोगावयाच्या आहेत.

From around the web