जळकोटच्या मटका बुकी चालकाचे परिसरात जाळे
जळकोट - नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या सर्वच छोट्या - मोठ्या गावात पाट्या लावून कल्याण आणि मुंबई मटका राजरोस घेतला जात आहे. त्याचा मुख्य म्होरक्या म्हणजे बुकी चालक जळकोट येथील असून, त्याचा स्थानिक गुन्हे शाखा आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनला दरमहा हप्ता सुरु आहे. त्यामुळे पोलीस डोळ्यावर काळी पट्टी बांधून मूग गिळून गप्प आहेत.
नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि म्हणून सिद्धेश्वर गोरे जॉईन झाल्यापासून दारू, मटका, जुगार, गुटखा विक्री, धाब्यावर बेकायदा दारू विक्री आदी अवैध धंदे राजरोस सुरु झाले आहेत. मटका तर कधी नव्हे पहिल्यांदा उघड उघड सुरु आहे. मटक्यामुळे गोरगरिंबांचे संसार उधवस्त झाले आहेत तर पोलिसांचे संसार फुलले आहेत. कल्याण मटक्यामुळे पोलिसांचे चांगलेच 'कल्याण' झाले आहे, तर गोरगरीब भिकेला लागले आहेत.
नळदुर्ग पोलीस एकाद्या पानाच्या ठेल्यावर काठी आपटत गेले तरी तेथे मटक्याचे आकडे घेतले जात आहेत, याची साधी गंधवार्ताही पोलिसांना लागत नाही, हे विशेष. मटक्यामध्ये दहा रुपयाला आठशे रुपये मिळतात या नादात सर्वस्व गमावणायची पाळी अनेकांवर आली आहे. मटक्यामुळे ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना अशी अवस्था अनेकांची झाली आहे तर पोलीस मात्र कलेक्शन करण्यात इतके व्यस्त झाले आहेत की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तरी त्याचे त्यांना भान नाही.
कल्याण आणि मुंबई मटक्याचा मेन बुकी चालक जळकोट येथील असून, त्याचा स्थानिक गुन्हे शाखेला ५० हजार तर नळदुर्ग पोलीस स्टेशनला ८० हजार हप्ता दरमहा सुरु आहे. पोलीस मटक्याचे 'भोगी' झाल्याने कारवाई करण्याचा 'अरुण' दय कधी झालास नाही. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी दुर्लक्ष कसे काय करतात ? हे एक कोडेच आहे.