नळदुर्गमध्ये पाट्या लावून मटका सुरु
नळदुर्ग - नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि सिद्धेश्वर गोरे जॉईन झाल्यापासून नळदुर्ग, अणदूर, जळकोट, ईटकळ आदी सर्वच भागात अवैध धंद्याचे जणू पेवच फुटले आहे. या सर्वच गावात पान टपरीवर पाट्या लावून उघड उघड मटका घेतला जात आहे. पोलीस मात्र हप्ते घेऊन मूग गिळून गप्प आहेत.
नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर किल्ला परिसरात पाट्या लावून मटका घेतला जात असताना, साहेब डोळे असून आंधळ्यासारखे वागत आहेत. शहरातील क्रांती चौक, पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, इंदिरानगर, वसंतनगर, अक्कलकोट रोड आदी भागात उघड उघड मटका घेत जात असताना, त्याकडं अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. मटका बहाद्दरांची अवस्था ओपन जेवू देईना, क्लोज झोपू देईना अशी झाली आहे तर पोलीस मात्र हप्ते वाढवून मिळाल्यामुळे गांधारीप्रमाणे डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प आहेत.
मटक्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार मोडीत निघाले असताना , पोलिसांचे संसार मात्र फुलत आहेत. मटका, जुगार, हातभट्टी दारू, गुटखा विक्री यातून दरमहा किमान पाच लाख वसुली सुरु असून, त्यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली आहे. नळदुर्ग शहरात मटक्याबरोबर चक्री जुगार देखील तेजीत आला आहे.
नळदुर्गजवळील पाटील तांड्यावर लाखो लिटर हातभट्टीची दारू गाळप होत असताना, एकदाही रेड करण्याचे धाडस गोरे यांनी केले नाही. गोरेंच्या काळ्या कारभारामुळे नळदुर्ग परिसर अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे.