निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना पुन्हा अटक
धाराशिव - धाराशिव नगर पालिकेत केलेल्या लाखो रुपयांचा अपहार प्रकरणी तसेच विविध संचिका गायब प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना पुण्यात राहत्या घरी अटक केली आहे, यलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये हा सहावा गुन्हा दाखल झाला आहे.
निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये यापूर्वी एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. १२ दिवस पोलीस कस्टडी आणि १४ दिवस दिवस जेल झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर पुन्हा आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नवीन गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद उस्मानाबाद येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उस्मानाबाद हा. मु. रा. समर्थ नगर उस्मानाबाद यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
खरे सूत्रधार बाहेर
धाराशिव नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून हरीकल्याण यलगट्टे कार्यरत असताना, ते पालिकेचा कारभार हाकणाऱ्या एका नेत्याच्या हातचे बाहुले झाले होते. त्या नेत्याचा एक नातेवाईक पालिकेत नगर अभियंता पदावर कार्यरत होता, त्याने यलगट्टे यांच्या सह्या घेऊन लाखो रुपयाचा अपहार केला. या राजकीय नेत्याने अनेक बोगस बिले काढून येलगट्टे यांना गोत्यात आणले आहे. हरीकल्याण यलगट्टे यांनी तोंड उघडल्यास खरे सूत्रधार या प्रकरणी सापडू शकतात, पोलीस एकास टार्गेट न करता, खरे सूत्रधार शोधणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.