धाराशिव न.प. घोटाळा : लेखापाल सूरज बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 

आनंदनगर पोलीस बोर्डे आणि पवार यांना आता तरी अटक करणार का ? 
 
AS

धाराशिव - धाराशिव नगर पालिकेत हरिकल्याण जनार्धन येलगट्टे हे मुख्यधिकारी असताना, कोट्यवधी रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला आहे तसेच या घोटाळ्याच्या संचिकाच गायब झाल्या आहेत. याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  आजपर्यंत सात गुन्हे दाखल  झाले असून, आणखी दोन ते तीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 


धाराशिव न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल )  आणि प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) हे दोघे फरार आहेत. पैकी सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल यांनी अटकपूर्व जामीन  मिळावा म्हणून  धाराशिव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यानंतर प्रशांत विक्रम पवार यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे. 

गुन्हा दाखल  होऊन २० दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे आणि पवार यांना  अटक केलेली नाही. अटकपूर्व जामीन  अर्ज नामंजूर झाल्यानंतर तरी आनंदनगर पोलीस त्यांना अटक करणार की  नेहमीप्रमाणे  अभय देणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 


काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद उस्मानाबाद येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या  अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उस्मानाबाद हा. मु. रा. समर्थ नगर उस्मानाबाद यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सातवा गुन्हा दाखल 

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

From around the web