तुळजापूर आणि उमरगा शहरात भर दिवसा धाडसी चोऱ्या
चोरट्यांनी छायाचित्रे देऊनही पोलिसांना चोरटे सापडेनात
तुळजापूर / उमरगा : धाराशिव शहरासह जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा, भूम,परंडा आदी ठिकाणी नागरिकांच्या हातातील पैश्याची बॅग पळवण्याचे प्रकार वाढले आहेत . २४ एप्रिल रोजी तुळजापुरात दोन चोरटयांनी एकाच्या हातातून सहा लाखाची बॅग हिसकावून घेऊन पोबारा केला होता तर उमरगा शहरात दि.27 रोजी भरदिवसा मुलीच्या शिक्षणाची फिस भरण्यासाठी,बँकेतून एक लाख ६० हजार रुपये काढून गावी मोटारसायकल निघण्याच्या तयारीत असताना, अज्ञात चोरट्यानी महिलेच्या हातात पैसे आसलेली पर्स हिसकावून धूम ठोकली होती. या दोन्ही घटनेची छायाचित्रे पोलिसांना देऊन देखील या चोरट्यांचा शोध अद्याप लागलेला नाही, यावरून पोलीस किती निष्क्रिय झाले आहेत, हे दिसून येत आहे.
धाराशिव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अवैध धंद्याचे पेव फुटले आहे. तसेच खून, दरोडे, चोऱ्या आदी गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरदिवसा नागरिकांच्या हातातून बॅग हिसकावून पोबारा होण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. दि. २४ एप्रिल रोजी नळदुर्ग येथील वाजिद इनामदार व इकबाल शेख हे तुळजापुर येथे घर खरेदी रजिस्ट्री साठी गेलेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातून सहा लाखाची बॅग हिसकावून घेऊन पोबारा केला. तसेच दि.२७ रोजी उमरगा शहरातील एचडीएफसी बँकेसमोर मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या हातातील एक लाख साठ हजार रुपये हिसकावून धूम ठोकली होती.
तसेच उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेतून, मुलीच्या शिक्षणासाठी पैसे काढण्यासाठी तालुक्यातील बेडगा येथील शेतकरी सुधीर पाटील हे आपल्या पत्नीसह 12 च्या सुमारास आले होते.पत्नी रागिणी सुधीर पाटील यांच्या खात्यावरील एक लाख साठ हजार काढून ते पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवले.त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास ते गावी जाण्यासाठी बँकेतून बाहेर पडले. बाहेर रस्त्यावर लावलेल्या दुचाकी जवळ आले असता, अचानक पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने रागिणी पाटील यांच्या हातात असलेली पर्स हिसकावून पसार झाले.यावेळी रागिणी पाटील यांनी आरडाओरड केली तर त्यांचे पती सुधीर पाटील हे आपल्या दुचाकीवर चोरट्यांचा पाठलाग केला.चोरटे हे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून शिवाजी कॉलेजच्या पुढून दिसेनासे झाले
या दोन्ही घटनेची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. त्यांची छायाचित्रे तुळजापूर आणि उमरगा पोलिसांना देण्यात आली आहेत. पण त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस नेमके काय करतात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.