परंड्यात अवैध गोवंशीय मांस वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
परंडा - शहरातील दर्गा रोड, ईदगाहच्या पाठीमागील बाजूस एका टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले असून, याप्रकरणी पोलिसांनी अंदाजे 14 टन 370 किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस आणि आयशर टेम्पो जप्त केला आहे.
दि.08.09.2023 रोजी 12.55 वा. सु पोलीस ठाणे परंडाचे प्रभारी अधिकारी इज्जपवार, सपोनि मुसळे, सुर्वे, पोलीस पथक असे पोलीस ठाणे परंडा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस पथकास, कुह्राड गल्ली ते करमाळा रोडकडे जाणाऱ्या दर्गा रोड, ईदगाहच्या पाठीमागील बाजूस असलेल्या के. बी. एक्स. भंगारच्या पत्रयाचे शेडलगत संषयास्पदरीत्या एक आयशर टॅम्पो क्रमांक एम एच 42 ए. क्यु. 3397 उभा असलेला दिसला तसेच त्याचा चालक, मालक तेथे नसल्याचे दिसुन आले.
त्यावेळी पथकाने नमुद टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये जनावरांची मांस भरलेले असल्याचे दिसून आले. सदर टेम्पोमध्ये मिळून आलेले अंदाजे 14 टन 370 किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस असे एकुण 28,00,000 ₹ किंमतीचे, सह आयशर टेम्पो क्र एमएच 42 क्यु 3397 असा एकुण 38,74,000₹ किंमतीचा माल नमुद टेम्पो मध्ये मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.
सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद परंडा यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश करण्याची तजवीज ठेवली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार- नितीन प्रकाशराव गुंडाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे नमुद अज्ञात टेम्पो चालका विरुध्द गुरनं 226/2023 महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9, 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षकनवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परंडाचे प्रभारी अधिकारी इज्जपवार, मसपोनि मुसळे, सपोनि सुर्वे, पोलीस ठाणे परंडाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.