नगर पालिका घोटाळ्यातील आरोपींना आनंदनगर पोलिसांचे अभय
धाराशिव - धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून महिना होत आला तरी आनंदनगर पोलिसांना बोर्डेचा मागमूस न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना देखील पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे आरोपी आणि आनंदनगर पोलिसांत साटेलोटे आहे की काय ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
लेखापाल सुरज संपत बोर्डे आणि लेखा परीक्षक प्रशांत विक्रम पवार यांच्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून महिना होत आला तरी आनंदनगर पोलिसांना बोर्डेचा मागमूस लागलेला नाही. लेखा परीक्षक प्रशांत विक्रम पवार यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता पण बोर्डे यांचा अर्ज नामंजूर झाल्यानंतर त्यांनी अर्ज परत घेतला आहे.
लेखापाल सुरज संपत बोर्डे आणि लेखा परीक्षक प्रशांत विक्रम पवार यांना पोलीस अटक करीत नसल्याने आरोपी आणि पोलीस यांच्यात अर्थपूर्ण बोलणी झाल्याची चर्चा सुरु आहे. एकीकडे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने गुन्हेगारी वाढली आहे तर दुसरीकडे गंभीर गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात पोलीस असमर्थ ठरत असल्याने पोलीस निरीक्षक बांगर यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण ?
आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद उस्मानाबाद येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उस्मानाबाद हा. मु. रा. समर्थ नगर उस्मानाबाद यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.