धाराशिवमध्ये चार हजारांची लाच घेणाऱ्या लेखा सहाय्यकासह सेवानिवृत्त अभियंत्यास अटक

 
lach d

धाराशिव - जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिपाई असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याची शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये काढून देण्यासाठी पंचायत समितीच्या वरिष्ठ लेखा सहाय्यकासह एका सेवानिवृत्त अभियंत्याने संबंधित महिलेच्या मुलाकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. 

यातील एका ३० वर्षीय तक्रारदार यांची आई या जिल्हा परिषद शाळेतून शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण  व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये रक्कम तक्रारदार यांच्या आईच्या खात्यावर जमा करून देण्यासाठी धाराशिव पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक लेखा मिलिंद सुर्यकांत कांबळे (वय- ४५ वर्षे, वर्ग -३), हनुमंत गोपाळ पवार (वय- ६९ वर्षे) सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, रा. काकडे प्लॉट धाराशिव ( खाजगी व्यक्ती ) यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम दि.२८ सप्टेंबर रोजी आरोपी कांबळे यांनी लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली.  या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (मो.न.9923023361) यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्ष सिध्दाराम म्हेत्रे (मो.न.9594658686) यांनी सापळा रचून केली. या सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार  दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे,सिद्धेशर तावस्कर,अविनाश आचार्य,नागेश शेरकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव कार्यालय फोन क्रमांक 02472 222879 व टोल फ्री क्रमांक-1064 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

From around the web