ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टरचा मृत्यू 

तुळजापूर - नळदुर्ग रस्त्यावर गंधोरा शिवारात अपघात , उमरगा तालुक्यातील डॉक्टरचा मृत्यू 
 
Osmanabad police

नळदुर्ग -  तुळजापूर - नळदुर्ग रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.   दुचाकीला ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  गंधोरा शिवारात घडली. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला आहे.

व्यवसायाने डॉक्टर असलेले विजय सूर्यवंशी (३७,रा. डिग्गी ता. उमरगा ) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच २५ ए एच २२३०) मुलीच्या शैक्षणिक कामासाठी उस्मानाबाद येथे गेले होते. ते दुपारी परतत असताना गंधोरा शिवारात नळदुर्गच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सूर्यवंशी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

त्यांच्या पार्थिवावर सलगरा (दि) प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. नळदुर्ग-तुळजापूर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. डॉ. सूर्यवंशी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे डिग्गी गावावर शोककळा पसरली आहे.

शेतमजूर महिलेचा मृत्यू

तेर  - शेतात सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या शेतमजूर महिलेचा महावितरणच्या तुटलेल्या जिवंत ताराचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर शिवारात मंगळवारी (दि.५)दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे तेरमध्ये हळहळ व्यक्त हाेत असून महावितरणविरुध्द संताप व्यक्त होत आहे.

तेर येथील विठाबाई दत्तू भोसले (५०) महिला तेर शिवारातील ग.नं. ११६१ मधील शेतात सोयाबीन काढणीसाठी मजुरीवर गेली होती. या महिलेचा सोयाबीन काढताना तुटलेल्या जिवंत विद्युत तारेवर पाय पडला. विजेचा धक्का लागून त्या जमिनीवर काेसळल्या. यात विठाबाई भोसले या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यावेळी तेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय विश्वकर्मा यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तेरचे तलाठी प्रशांत देशमुख यांनी घटनास्थळास भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान महावितरणच्या दुर्लक्षामुळे झालेल्या घटनेमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
 

From around the web