येरमाळा : महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
उस्मानाबाद - एका महिलेसोबत लग्न न करता पतीसारखे राहत असलेल्या मात्र मानलेल्या पतीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. या दरम्यान त्या दोघींमध्ये सतत भांडणे होत होती. त्यामुळे त्या महिलेने लग्न न करता मानलेल्या पतीने तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी न्यायालयाने कर्दनकाळ बनलेल्या त्या आरोपी पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश के.आर. पेठकर यांनी महिलेचा खून केल्या प्रकरणी जन्मठेप तर पुरावा नष्ट केल्या प्रकरणी ३ वर्ष सक्त मजुरी अशी दुहेरी शिक्षा दि.१८ मे रोजी ठोठावली.
याबाबत अतिरीक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. २० जून २०१६ रोजी कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात एका अनोळखी महिलेचे सडलेले प्रेत येरमाळा घाटामध्ये बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाझर तलावाच्या जवळ आढळून आल्याचा पोलिस ठाण्याला निनावी फोन आला. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जावून प्रेताचा पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करून ते प्रेत शव विच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यावेळी सदर प्रेताच्या हाडाचे नमुने सदर प्रेताची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर सरकार पक्षातर्फे पोलिस कॉन्स्टेबल किरण मुंढे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. ४८/२०१६ कलम ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम जाधव यांनी केला. या तपासामध्ये बीड जिल्ह्यातील होळ या गावातील उषा अर्जुन कसबे नावाची महिला ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे कळाल्याने तपासीक अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा मुलगा पंकज अर्जुन कसबे याच्या रक्ताचे नमुने त्या महिलेच्या प्रेताची ओळख पटविण्याकामी डी.एन.ए. नमुने घेण्यात आले व ते नमुने मुंबई येथील कल्याण येथील न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंकज कसबे हा अनोळखी प्रेताचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून तपासीक अधिकाऱ्यांनी विविध साक्षीदारांकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले.
तपासामध्ये असे निष्पन्न झाले की, मयत उषा अर्जुन कसबे हिचे पुर्वीचे नाव बसवव्या रुद्राप्पा जलगेरी असे होते. तर ती मुळची कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदती तालुक्यातील बेनकट्टी होती. ती महिला व आरोपी अर्जुन कसबे हे इचलकरंजी येथे गुत्तेदाराकडे एकाच ठिकाणी काम करण्यास होते. त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली. बसवव्या उर्फ उषा हिस पूर्वीच्या पतीकडून पंकज नावाचा मुलगा आहे. त्यानंतर आरोपी व बसवव्वा उर्फ उषा मुलगा पंकजसह आरोपीच्या गावी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील होळ याठिकाणी वास्तव्यास आले. विशेष म्हणजे ते एका भाड्याच्या खोलीमध्ये लग्न न करता बऱ्याच दिवसांपासून पती-पत्नीसारखे राहत होते.
दि..९ जून २०१६ रोजी आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर मयत व आरोपी यांच्यात नेहमी भांडण होत असत. दि.१७ जून २०१६ रोजी आरोपीने मयत बसवव्या उर्फ उषा हिस आजारी असल्याने लातुरला दवाखान्यात घेवुन जातो असे मुलगा पंकज यास खोटे सांगून मयत बसवच्या उर्फ उषा हिस पंढरपुरकडे मोटार सायकलवर घेवुन गेला. मात्र परत गावाकडे येताना येरमाळा घाटामध्ये आरोपीने मयत बसवव्या उर्फ उषा हिच्या डोक्यात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवून दगड घालून ठार मारले. तर तिची ओळख पटु नये म्हणून तिच्या अंगावरील साडी व स्वतःचा रक्ताने भरलेला शर्ट गावाकडे येताना वाटेत फेकून देऊन पुरावा नष्ट केला. तसेच मयताच्या अंगावरील सोन्याचे डोरले व मणी मंगळसुत्र आरोपीने तिला ठार मारल्यानंतर तोडुन काढून घेतले होते. तर त्यापैकी काही मणी घटनास्थळी सापडलेले असून ते डोरले व ७ मणी होळ येथील सोनाराकडे विकले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सपोनि विनोद चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी उस्मानाबाद येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश के.आर. पेठकर यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. तर या प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्यावतीने एकुण २६ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच या प्रकरणात आरोपीच्या व मयताच्या मोबाईलवे टावर लोकेशन, आरोपी व मयत यांना मृत्युपूर्वी एकत्र पाहणारे साक्षीदार यामध्ये पेटोल पंपावरील मुलगा, हॉटेल चालक, गावातील साक्षीदार तसेच बसवला उर्फ उषा हिचा पूर्वीचा पती, भाऊ, बांधकाम गुत्तेदार, सोनार, ब्राम्हण, आरोपी व मयताचे शेजारी, डी.एन.ए. विश्लेषक, मोबाईल कंपनीचे नोडल ऑफीसर, वैदयकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. हे प्रकरण हे संपुर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यावर अधारीत होते. त्यामुळे वरील साक्षीदारांच्या पुराव्यावरून परिस्थितीजण्य पुराव्याची साखळी जोडण्यास सरकार पक्षास यश आले.
अभियोग पक्षातर्फे न्यायालयात अतिरीक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी घेतलेले साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून व त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील होळ येथील आरोपी अर्जुन किसन कसबे यास भादंवि कलम ३०२, २०१ नुसार दोषी ठरवून भादंवि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५०० रुपये दंड तसेच कलम २०१ अन्वये ३ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा दि.१८ मे रोजी सुनावली.अभियोग पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी काम पाहिले व पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधाकर सगर यांनी काम पाहिले.