उस्मानाबादेत अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावगुंडांचा हल्ला
उस्मानाबाद - शहरातील खिरणीमळा भागातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तेथील गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली झाली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक खलिफा कुरेशीसह त्यांचा भाऊ कलीम कुरेशी अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिरणीमळा, उस्मानाबाद येथे गोवंशीय प्राण्यांची मांसासाठी अनाधिकृतरित्या कत्तल होत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास दि. 05.02.2022 रोजी 22.00 वा. सु. मिळाली. यावर स्था.गु.शा. च्या पोनि- गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- काझी, घुगे, चव्हाण, आरब, कवडे, पोना- सावंत, जाधवर, पोकॉ- कोळी, आरसेवाड, ठाकुर, मरलापल्ले यांच्यासह पोलीस मुख्यालयातील दंगा काबु पथक अशा पथकाने 22.30 वा. सु. खिरणीमळा येथे छापा टाकला असता तेथील पत्रा शेडमध्ये हुसेन पापा शेख, फैसल कैसर पठाण, सागर कबीर गायकवाड, आनंद जीवन पेठे हे चौघे 12- 14 गुरांची कत्तल करुन मांस, डोके, पाय असे अवयव व मांस कापत असल्याचे आढळले.
यावेळी नमूद चौघांसह बाजूच्या अंधारातून कत्तलखाना चालक-मालक राष्ट्रवादीचे नगरसेवक खलीफा कुरेशी व कलीम कुरेशी यांसह अन्य 5-6 अनोळखी पुरुषांनी पोलीसांसह स्थानिक नागरीक- पवन कोमटी, सुमीत नवले, धन्यकुमार पटवा, सतीष सिरसीला यांच्यावर दगडफेक केली. यासोबतच नमूद चौघांनी कत्तलखान्यातील चाकुने पोलीस व नागरीकांवर हल्ला केला. या हल्ल्यात धन्यकुमार पटवा यांच्या उजव्या पायाला, दोन्ही हातांना व डोक्याला तर संतोष सिरसीला यांच्या डोक्यास जखम झाली. तसेच पोलीस पथकातील समाधान नवले यांच्या उजव्या डोळ्यास, बबन जाधवर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत तर पथकातील अनेकांना किरकोळ जखमा झाल्या. यावेळी पोलीसांनी नमूद चौघांना तेथे आढळलेल्या सुमारे 2,820 कि.ग्रॅ. वजनाच्या गोवंशीय मांसासह कत्तल साहित्यासह ताब्यात घेतले.
या प्रकरणी सपोनि- श्री. शैलेश पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद सहा लोकांसह अन्य 5-6 अनोळखी पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 333, 326, 325, 324, 143, 147, 148, 149 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम- 5(कत्र, 9 (अ) अंतर्गत उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.