तुळजापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या  नराधमास २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

स्केचच्या आधारे आरोपीचा लावला छडा
 
Osmanabad court

उस्मानाबाद -  एका महामार्गालगत असलेल्या उसाच्या शेतात १३ वर्षीय शालेय बालिका नैसर्गिक विधी करीत होती. त्याचवेळी एका पिकअप ड्रायव्हरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी विशेष (पोक्सो) न्यायालयाचे न्यायाधीश सतीश जगताप यांनी त्या लिंग पिसाट नराधमास २० वर्ष सक्तमजुरी व ८ हजार रुपयांच्या दंडाची दुहेरी शिक्षा दि.४ जून रोजी ठोठावली आहे. विशेष म्हणजे याचा न्यायनिवाडा उच्च न्यायालयातील न्याय निवाड्याच्या आधारे करण्यात विशेष शासकीय अभियोक्त्यांना यश आले आहे.

याबाबत विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील एका गावातून राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उसाच्या फडामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पुळकोटी येथील विलास कोंडीबा गलांडे हा नैसर्गिक विधीसाठी आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावून दि.२५ जून २०१७ रोजी गेला होता. यावेळी त्या उसाच्या फडामध्ये एक १३ वर्षीय अल्पवयीन शालेय बालिका शाळेतून घरी आल्यानंतर त्या उसाच्या फडामध्ये एकटीच नैसर्गिक विधी करीत असल्याचे पाहून  त्याने तिला आतमध्ये नेवून तिचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता.  

याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याने त्या बालिकेचा गळा दाबून ही घटना कुणाला सांगितली तर तुला जिवंत मारीन व तिची जिंदगी खराब करण्याची व तुझ्या सोबत कोणीही लग्न करणार नाही अशी धमकी दिली होती. या भीतीने त्या अनोळखी व्यक्तीचे संपूर्ण वर्णन सांगितले होते. पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गु.र.नं.१८०/२०१८ गुन्हा कलम ३७६ (३), ३२३ भादंवि व पोक्सो कायद्याचे कलम ४, ८ व १२ नुसार गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी केला. 

या घटनेचा घटनास्थळाचे बाजूच्या रस्त्यावरील एका पानटपरी चालकाने घटनेच्या वेळी आरोपीला त्याचे वाहन रस्त्यावर लावून पाण्याची बाटली घेऊन उसात गेल्याचे व काही वेळाने तोच व्यक्ती धावत पळत येऊन पिकप वाहन चालू करून तुळजापूर शहराकडे गेल्याचे पाहिले होते. तसेच घटनेच्या वेळी महामार्गावर लाईट खांबावर काम करीत असणाऱ्या दोन साक्षीदारांनी पिकप वाहन थांबून उसात गेल्याचे व त्या ठिकाणी एका मुलीला उचलल्याचे या साक्षीदारांकडून निष्पन्न झाले. तर या साक्षीदार व पीडित मुलीने सांगितलेल्या अनोळखी व्यक्तीच्या वर्णनावरून आरोपीचे स्केच तयार करण्यात आले. तसेच तुळजापूर शहरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता साक्षीदारांनी सांगितलेल्या वर्णनाचे वाहन शहरात फिरल्याचे दिसून आले. तर पुढील तपासात सपोनि डी.डी. बनसोडे यांनी सोलापूर येथून आरोपीचा शोध घेऊन आरोपी व पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी या आरोपीचे नाव विलास गलांडे असल्याचे निष्पन्न झाले. 

तसेच या आरोपीची अतिरिक्त कार्यकारी दंडाधिकारी यांच्यामार्फत ओळख परेड घेतली असता त्या आरोपीस पीडितेने ओळखल्याने तिच्यावर अत्याचार करणारा हाच माणूस आरोपी आहे हे सिद्ध झाले होते. विशेष म्हणजे पुढील तपासात आरोपीच्या मोबाईल नंबरचे टॉवर लोकेशन हे घटनेच्या वेळी घटनास्थळावरील असल्याचे निष्पन्न झाले. तर पीडिता ही अनुसूचित जातीची असल्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

 या प्रकरणाची सुनावणी उस्मानाबाद येथील विशेष (पोक्सो) न्यायालयाचे न्यायाधीश सतीश जगताप यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षाच्या वतीने सोहळा साक्षीदार तपासण्यात आले सुनावणी कामी न्यायालय पैरवी महिला पोलिस नाईक वनीता वाघमारे यांनी सहकार्य केले. एकूण साक्षीदार मध्ये पिता पीडितेची आजी आरोपीस घटनेपूर्वी व घटनेनंतर घटनास्थळावर पाहणारे साक्षीदार, आरोपीची ओळख परेड घेणारे अतिरिक्त कार्यकारी दंडाधिकारी व मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. 

या संदीप प्रकरणातील पीडितेवर झालेला अत्याचार हा लैंगिक अत्याचार (बलात्कार) होतो किंवा नाही याबाबतीत संदिग्ध पुरावा होता. परंतू सरकार पक्षातर्फे काम पाहणारे विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे दाखल केले होते. या न्याय-निवाड्यांचा आधार घेऊन न्यायालयाने व विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विलास गलांडे यास भादंविचे कलम ३७६ (३) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ नुसार दोषी धरून भादंवि कलम ‌३७६ (३) नुसार २० वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम ३२३ अन्वये २ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा दि.४ जून रोजी सुनावली असून दोन्ही शिक्षा एकत्र  भोगावयाच्या आहेत.

From around the web