तुळजापूर - तीन हजारांची लाच घेणारा अव्वल कारकून गजाआड
उस्मानाबाद - तुळजापूर तहसील कार्यालयातील एका अंध कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेली वेतन निश्चिती ही चुकीची झाली आहे. त्यामुळे सुधारित वेतन निश्चिती करून दिल्याचे बक्षीस म्हणून ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात त्याच तहसील कार्यालयातील डोळस अव्वल कारकून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दि.८ ऑगस्ट रोजी अलगद अडकला आहे. त्यामुळे अंध कर्मचाऱ्यांची डोळस व्यक्ती प्रकाशात कशी फसवणूक करते हे समोर तर आले आहेत. शिवाय महसूल प्रशासनातील लाच घेणारी मंडळी कशी सक्रिय व माहिर आहे ? याची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहेत.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, यातील तहसील कार्यालयातील एका ५३ वर्षीय तक्रारदार यांची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे झालेली वेतन निश्चिती ही चुकीची झाली असल्यामुळे ती सुधारित वेतन निश्चिती करून तुळजापूर तहसील कार्यालयातील लोकसेवक अव्वल कारकून चंद्रकांत माणिक गोरे (वय ४७ वर्षे) वर्ग- ३ याने ती दुरुस्त करून दिली. चुकीची दुरुस्ती करून देणे हे त्याचे कर्तव्य असताना देखील काम करून दिल्याचा मोबदला म्हणजेच बक्षीस म्हणून गोरे याने तक्रारदारांकडे पंचांसमक्ष दि.४ ऑगस्ट रोजी ३ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती. ती ३ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम त्याने दि.८ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष स्विकारली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या डोळस अव्वल कारकुनाला गजाआड करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उस्मानाबाद येथील पोलिस उपअधीक्षक सापळा अधिकारी तथा पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक विकास राठोड यांनी केली आहे.
या सापळा पथकामध्ये पोलिस अंमलदार मधुकर जाधव, अर्जुन मारकड, सचिन शेवाळे, विशाल डोके ,विष्णू बेळे, चालक दत्तात्रय करडे यांनी केली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने कोणी खासगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संपते मो.नं.- ९५२७९४३१००, पोलिस निरीक्षक अशोक हुलगे मो.नं.- ८६५२४३३३९७, विकास राठोड मो.नं.- ७७१९०५८५६७ व कार्यालय ०२४७२ - २२२८७९ या संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.