उस्मानाबादेतील तरुणाचा मुरूम जवळ मृतदेह सापडला 

 खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, संशयित ताब्यात
 
crime

मुरूम - उस्मानाबाद येथील ३३ वर्षीय तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुरूम अक्कलकोट रस्त्याच्या लगत असलेल्या एका शेतात पुरल्याची घटना बुधवारी (दि २२) दुपारी उघडकीस आली.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर मजगे (३३) हे गेल्या अनेक दिवसांपासून उस्मानाबाद येथून बेपत्ता झाले होते. याबाबत आनंद नगर पोलिस ठाण्यात नातेवाइकांनी तक्रार दिली होती. दरम्यान मुरूम येथे वास्तव्यास असलेल्या सिद्धेश्वर मजगे यांच्या भावाला सिद्धेश्वर याचा खून करून प्रेत मुरूम अक्कलकोट रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील पाइपाजवळ पुरल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी पोलिस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली.
यावरून मुरूम पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम अक्कलकोट रस्त्यावर असलेल्या गुलाब हंगरगे यांच्या शेतातील पाइप जवळ उकरून पाहिले. त्यावेळी एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांच्या तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर एम जगताप यांनी कसून चौकशी सुरू केली असून चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

From around the web