लाच मागीतल्याच्या आरोपातून तुळजापूर तालुक्यातील महिला तलाठ्याची निर्दोष मुक्तता

 
Osmanabad court

 उस्मानाबाद - वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांची नावे 7/12 उतार्‍यावर घेण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच मागीतल्याच्या आरोपातून तुळजापूर तालुक्यातील तडवळा सज्जाच्या महिला तलाठी सुकेशनी पांडूरंग कांबळे यांना विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील देवीदास भानुदास यादव यांचे वडील भानुदास यादव हे 24 नोव्हेंबर 2003 रोजी मयत झाले होते. त्यांच्या नावे असलेली बोरी येथील जमीन नं. 80 मधील एक हेक्टर 8 आर जमिनीच्या महसूल दप्तरी वारस म्हणून तक्रारदार देवीदास यादव व त्यांच्या तीन बहिणींच्या नावे नोंद घेण्यासाठी तडवळा सज्जाच्या महिला तलाठी सुकेशनी कांबळे यांच्याकडे  28 एप्रिल 2014 रोजी अर्ज दिला होता. तलाठी कांबळे यांनी फेरफारची कार्यवाही न केल्याने यादव यांनी त्यांची भेट घेतली असता, कांबळे यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केली व यादव यांनी त्यांना तीनशे रूपये दिल्याचा आरोप तक्रारीत केला होता. त्यानंतर 5 जून 2014 रोजी यादव यांनी तलाठी कांबळे यांना फोन करून कामाबाबत विचारणा केली असता, उर्वरित 700 रूपये दिल्याशिवाय काम होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर 9 जून रोजी यादव यांनी तलाठी कांबळे यांची भेट घेतली व त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जावून काका मस्के यांच्याकडे दीड हजार रूपये देण्यास सांगितले. 

लाच देण्याची इच्छा नसल्याने यादव यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 9 जून रोजी तक्रार दिली. तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पंच रवींद्र मोरे व मनीषा कदम यांना तलाठी कांबळे या लाच मागतात का, याची पडताळणी करण्यास सांगितले. पंच रवींद्र मोरे हे तलाठी कांबळे यांच्याकडे गेले. त्या ठिकाणी कांबळे यांनी तक्रारदाराकडे दीड हजार रूपये मागणी केली असल्याची बाब ध्वनीमुद्रीत करण्यात आली. त्यानंतर 10 जून रोजी पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पंच मनीषा कदम व तक्रारदार यांना तलाठ्याकडे पाठविले, त्यावेळी तलाठी कांबळे यांनी तक्रारदारास दीड हजार रूपयांची रक्कम त्यांचा खासगी सहाय्यक काका मस्के यांच्याकडे देण्यास फोनवर सांगितले. त्यावेळी मस्के याची भेट घेतली असता, मस्के याने तक्रारदाराकडून लाचेचे पैसे घेण्यास नकार दिला. त्यावेळी तलाठी कांबळे यांच्याविरोधात लाच मागीतल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी तपास करून विशेष सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. यात सरकारपक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. परंतु सरकार पक्षातर्फे हजर करण्यात आलेला पुरावा विश्वासार्ह्य नसल्याचे तसेच ध्वनीमुदीत करण्यात आलेला आवाज हा तलाठी कांबळे यांचाच असल्याबाबत सबळ पुरावा न्यायालयासमोर आला नसल्याबाबत आरोपीचे वकिल अ‍ॅड. पी. एम. नळेगावकर यांनी युक्तीवाद केला. आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद व साक्षीपुराव्याचे अवलोकन करून विशेष सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल  यांनी महिला तलाठी सुकेशनी कांबळे यांची लाच मागीतल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
 

From around the web