उस्मानाबादेत दोन ठिकाणी दरोडा

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे चोरी आणि दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील कर्मवीरनगर, पोस्ट कॉलनी भागातील दोन घरांत रोडेखोरांनी धुडगूस घालून २२ तोळे सोने व रोख रक्कम लंपास केली .
दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांच्यावर सोलापूर येथे पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संतापाची बाब म्हणजे दरोडेखोरांनी महिलांवर अत्याचार करण्याची धमकी देऊन घरातील ऐवज लुटून नेला.
पोस्टकॉलनी परिसरातील गजानन मंदिराच्या बाजूला जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता निरीक्षक कन्हैय्या गंगाधर मदनुरकर (५२) वास्तव्यास आहेत. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाज्याचा कटावणीने आतील कोयंडा तोडून आत प्रवेश केला. सुरुवातीस दरवाजाचा आवाज येत असल्यामुळे मदनुरकर स्वत: झोपेतून जागे झाले. त्यावेळी दोघांनी कोणतीही विचारणा न करता त्यांच्या उजव्या हातावर लाकडाच्या दंडूक्याने वार केले. तसेच एकाने त्यांच्या पत्नी राजश्री यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांचा आवाज ऐकून दोन मुलीही पळत अाल्या. या दरम्यान मदनुरकर बेशुद्ध होऊन पडले. त्यावेळी आेरडल्यास अत्याचार करण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच चिल्लरचा गल्लाही नेला. जाताना चोरट्यांनी बाहेरून कडी लावून घेतली.
तसेच कर्मवीरनगरमधील शाम शिनगारे यांना लाकडी ठाेकळ्यांनी छातीवर व पोटात मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पत्नीच्या कानातील दागिने हिसकावून घेतल्याने त्याही जखमी झाल्या आहेत. कन्हैय्या मदनुरकर यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनेतील तिघांचीही प्रकृती ठिक आहे.