तोतया पोलीसांपासून जनतेने सतर्क रहावे - उस्मानाबाद पोलीस अधीक्षक 

 
sp osmanabad

उस्मानाबाद  - रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या वृध्द, महिला, अडाणी नागरीकांना अडवून, “आम्ही पोलीस आहोत, तुम्ही एवढे दागिने का घातले आहेत ? समोर दंगल चालू आहे, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, तुमच्या अंगावरील दागिने काढून तुमच्या पिशवीत / खिशात ठेवा.” अशा प्रकारे दरडावून तसेच बनावट पोलीस ओळखपत्रे दाखवून (तोतया पोलीस) नागरीकांना प्रभावात, विश्वासात घेउन त्यांच्या अंगावरील दागिने हातचलाखीने लांबवणारी टोळी सक्रीय असून अशा प्रकारे नागरीकांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

नुकतीच म्हणजे काल दि. 30 जुलै रोजी उस्मानाबाद शहरात अशीच एक घटना घडली. यात शहरातील हिरो शोरुम मागील रस्त्याने पायी जाणाऱ्या एक 75 वर्षीय वृध्दास एका मोटारसायकलवर आलेल्या दोन पुरुषांनी अडवून त्यांच्या अंगावरील 20 ग्रॅम सुवर्ण दागिने हातचलाखीने लांबवले. अशा प्रकारातून जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी बाजारपेठा, धार्मीक स्थळे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी वावरताना अशा तोतया पोलीसांपासून सावध रहावे. त्यांच्या कोणत्याही धमकीला बळी न पडता अशी घटना घडत असल्यास त्यांच्या प्रभावात येउ नये. नागरीकांच्या अंगावरील दागिने काढण्याचे काम पोलीसांचे नसल्याने खरे पोलीस अशा प्रकारे नागरीकांना अंगावरील दागिने, पैसे इत्यादी काढण्यास सांगत नाहीत.

असे तोतया पोलीस वावरत असल्याची नागरीकांची खात्री झाल्यास होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस मदत क्रमांक ‘डायल 112’ शी संपर्क साधावा. असे आवाहन . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे.

From around the web