उस्मानाबादेत तोतया पोलिसाने वृद्धास गंडवले 

15 ग्रॅम सुवर्ण साखळी व 20 ग्रॅमच्या 2 सुवर्ण अंगठ्या लंपास 
 
crime

उस्मानाबाद - “मी पोलीस असून आरोपीच्या शोधात आहे. तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा.” अशी बतावणी करून एका तोतया पोलिसाने एक वृद्धांचे 15 ग्रॅम सुवर्ण साखळी व 20 ग्रॅमच्या 2 सुवर्ण अंगठ्या लंपास केल्या. 

संजय गणपतराव जाधव (  वय 60 वर्षे, रा. उस्मानाबाद ) हे  आळणी टोलनाक्याजवळील रस्त्याने आपल्या मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका मोटारसायकलवरील हेल्मेटधारी अनोळखी पुरुषाने फिर्यादीची मो.सा. थांबवून, “मी पोलीस असून आरोपीच्या शोधात आहे. तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा.” असे फिर्यादीस बतावणी केली. 

यावर त्या तोतया पोलीसाने संजय जाधव यांच्या 15 ग्रॅम सुवर्ण साखळी व 20 ग्रॅमच्या 2 सुवर्ण अंगठ्या असे दागिने संजय यांच्या हातरुमालमध्ये बांधून ठेवण्यास सांगून ते आपल्या हाताने संजय यांच्या मो.सा. च्या डिकीत ठेवण्याच्या बहान्याने संजय यांच्या नकळत ते दागिने काढून घेतले. अशा मजकुराच्या संजय जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  भा.दं.सं. कलम- 420, 170 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तोतयागिरी करुन फसवणाऱ्यांपासून नागरिकांनी  जागरुक रहावे - पोलीस अधीक्षक 

तोतयागिरी करुन फसवणाऱ्यांपासून नागरिकांनी  जागरुक रहावे , असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेस केले आहे.

तोतयागिरी करुन दागिने, रक्कम इत्यादी उकळण्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारात अज्ञात स्त्री- पुरुष हे आपण पोलीस, नगरपालीका अधिकारी इत्यादी खात्यांतील असल्याची बतावणी करुन बनावट ओळखपत्रे दाखवून नागरीक विशेषत: वयोवृध्द व्यक्ती यांना त्यांच्याजवळील सुवर्ण दागिने, पैसे असा ऐवज काढून ठेवण्यास सांगूण तो ऐवज ते तोतया स्त्री- पुरुष हातचलाखीने आपल्याकडे घेउन त्यांची फसवणूक करतात. 
अशा प्रकारातून जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने उस्मानाबाद शहरातील जनतेने विशेषत: सार्वजनिक ठिकाणे यात बाजारपेठा, धार्मीक स्थळे इत्यादी ठिकाणी कोणी पोलीस अथवा अन्य खात्यातील अधिकारी- कर्मचारी असल्याची बतावणी करुन आपल्याजवळील मौल्यवान वस्तू काढण्यास सांगितले असता आपणास ते खोटे बोलून तोतयागिरी करत असल्याची खात्रीझाल्यास होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस मदत क्रमांक ‘डायल 112’ शी संपर्क साधावा. असे आवाहन  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेस केले आहे.

From around the web