आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी घेतला परांडा तालुक्यात जनता दरबार
उस्मानाबाद - जनता दरबार अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे जे पुढारी, लोकप्रतिनीधी तसेच अधिकारी यांच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे आता दर महिना-दोन महिन्याला जनता दरबार आयोजित केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केले.
परंडा येथील स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृह येथे आज परांडा तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील तसेच उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे आणि परंड्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर, मुख्याधिकारी तसेच आरोग्य, बांधकाम, पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून असलेले प्रलंबित प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी यांच्यावर “ऑन द स्पॉट” निर्णय घेण्यात आले.नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची दखल घेत जागेवरच अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याबाबत निर्देश दिले आणि आवश्यक त्या सूचना केल्या, याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
परंडा तालुक्याचे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना तसेच रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी आजचा हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर तसेच ज्या तक्रारी आणि प्रकरणावर आज कार्यवाही झाली नाही ? त्यांचा आणि दिलेल्या सूचनांचा अनुपालन अहवाल 15 दिवसांत सादर करावा तसेच ज्या प्रकरणांवर कार्यवाही करणे शक्य नाही त्या प्रकरणांवर पुन्हा स्वतंत्र बैठक घेऊन निकाली काढण्यात येईल, असेही डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
भूम तालुक्यातही याचप्रमाणे 15 दिवसानंतर जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. तेव्हा आज झालेल्या जनता दरबारातील प्रकरणांचा अनुपालन अहवाल सादर करावा, असेही डॉ. सावंत यावेळी म्हणाले.