शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी रु. ३५० कोटीचा CSR मिळणार…

- आ. राणाजगजितसिंह पाटील 

 
d

धाराशिव (उस्मानाबाद)  - येथे वैद्यकीय शिक्षण संकुल सुरू करण्याबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत CSR (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) च्या माध्यमातून रु. ३५० कोटी मागणीचा व संकुल निर्मितीच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय घेतले गेल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अश्विनी जोशी यांनी ‘ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट’ म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत व विद्यार्थ्यांच्या वासतिगृहसाठी CSR च्या माध्यमातून रु. ३५० कोटी देण्यासाठी काही उद्योग समूहांची तयारी असल्याची सांगितले. धाराशिव( उस्मानाबाद ) येथील वैद्यकीय महाविद्यालय या निकषात बसत असल्यामुळे याबाबतची मागणी केली जाणार आहे. या व्यतीरिक्त वैद्यकीय संकुलासाठी ५० एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे एकूण ३०  एकर जागा असून निकषा प्रमाणे त्यांना केवळ ५ एकर तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १० एकर जागेची आवश्यकता असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही संस्था शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया मध्ये सुरू ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ३० एकर व पाटबंधारे विभागाची २० एकर जागा वैद्यकीय संकुलासाठी उपलब्ध होवू शकते. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी या तिन्ही विभागाच्या मंत्री महोदयां सोबत संयुक्तिक बैठक घेण्याचे ठरले आहे.

   

मुख्य अभियंता, बांधकाम विभाग पुणे श्री. अतुल चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा च्या धर्तीवर प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार(पीएमसी) नेमण्याबाबत माहिती दिली व त्या धर्तीवर या संकुलाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. गवळी यांनी प्रशासकीय अडचणी मांडल्या व त्या वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत आश्वासित केले. 

ऐनवेळी उद्भवलेल्या काही अडचणीमुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन साहेब सदरील बैठकीस  उपस्थित राहू न शकल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती. अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीस डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, जिल्हाधिकारी  डॉ. सचिन ओंबासे, धाराशिव (उस्मानाबाद), मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अतुल चव्हाण,  प्रभारी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धारशिव डॉ. गवळी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या आधिकाऱ्यासह प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव (उस्मानाबाद), प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र धाराशिव (उस्मानाबाद), कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उस्मानाबाद व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

From around the web