बेंबळी :  चारित्र्याचा संशय घेऊन बायकोचा खून करणाऱ्या नवऱ्यास जन्मठेप 

 
court

उस्मानाबाद - चारित्र्याचा  संशय घेऊन बायकोचा डोक्यात दगड घालून व गळा दाबून खून करणाऱ्या सांगवी (बेंबळी ) एका नवऱ्यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आली आहे. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.आर. नेरलेकर यांनी दिला. 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील सांगवी (बेंबळी) येथील खुनी आरोपी महादेव पांडुरंग सुरवसे हा त्याची पत्नी सावित्री उर्फ बबीता हिच्यासह सांगवी येथे राहत होता. तो जुगार व दारु आदी व्यसने करीत होता. तसेच तो पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन मारहाण करायचा. तर २०१९ च्या गुढी पाडवा सणाच्या २ दिवसापूर्वी पत्नी बबीतास घेऊन पळसप येथे सावित्री उर्फ बबिताचा भाऊ पांडुरंग अंबादास चौधरी यांच्याकडे घेऊन गेला होता. त्यावेळी त्यांने पांडुरंग चौधरी यांना सावित्रीला शेवटचे बघून घ्या, असे म्हणून तो परत बबिताला सांगवी येथे घेऊन गेला. दि.७ एप्रिल २०१९ रोजी पती महादेव याने सांगवी येथील त्याच्या राहत्या घरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बबीता झोपलेली असताना तिच्या डोक्यात मोठा दगड घालून व गळा दाबून खून केला. 

 घडलेला प्रकार त्याने गावातीलच रविंद्र पांडुरंग पाटील यांना सांगितला. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ पांडुरंग चौधरी यांनी महादेव याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर भादविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बेंबळी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक उत्तम जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात महादेव याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. 

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्या साक्षीदारांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावा, स्वान पथकाचा पुरावा व आरोपीने एका साक्षीदाराला दिलेली गुन्ह्याची कबुली या आधारे सरकारी पक्षाचे विधीज्ञ देशमुख यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने तो गुन्हा ग्राह्य धरण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.आर. नेरलेकर यांच्यासमोर झाली. गुन्हेगाराने गुन्हा कबूल केल्याने व तो सिद्ध झाल्याने न्यायाधीश नेरलेकर यांनी आरोपी महादेव यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्षम कारावास अशी दुहेरी शिक्षा ठोठावली आहे. 

या प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा शासकीय अभियोक्ता जयंत व्ही. देशमुख यांनी कामकाज पाहिले.

From around the web