फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Apr 9, 2020, 20:37 IST
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची महत्त्वपूर्ण घोषणा
कोरोना महामारीच्या थैमानामुळे संपूर्ण देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही केंद्राकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने फळबागायतदारांकडून नाशवंत फळांची खरेदी केल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीपोटी केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल , असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले.
भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्र्बुद्धे व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसोबत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद घडवून आणला. यामध्ये राज्यातील आंबा , केळी, द्राक्ष, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या केंद्रीय कृषीमंत्र्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन, सर्वांना योग्य न्याय दिला जाईल, असे कृषीमंत्र्यांनी आश्वस्त केले. तसेच फळे उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री तोमर यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या.
या व्हिडिओ कॉन्फरन्स बद्दल अधिक माहिती देताना श्री. पाटील म्हणाले की , "शेतकरी या देशाचा कणा आहे. मात्र, कोरोना महामारी मुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्थेआभावी मागणी घटली आहे. फळे हा नाशवंत कृषीमाल असल्याने त्याला त्वरित बाजारपेठ, कोल्ड स्टोरेज तसेच राज्य सरकारकडून खरेदी करण्याची गरज आहे. तसेच, ज्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. यासंदर्भातील समस्या फळ बागायतदार शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांसमोर मांडल्या.
श्री. तोमर यांनी सर्व समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. श्री तोमर म्हणाले की , "फळ बागायतदारांकडून राज्य सरकारने नाशवंत फळांची खरेदी केल्यास त्यातून येणाऱ्या नुकसानीपोटी राज्य सरकारला मदत करण्यास तयार आहे. तसेच शेतकऱ्यांना ई-मार्केटवर शेतमालाच्या विक्रीसाठी केंद्र सरकारकडून ३.५ लाख खरेदीदार व विक्रेते, वाहतूकदार यांचा दरांसहित कोष तयार केला आहे. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच, उत्पादन क्षेत्र ते मागणी क्षेत्र या दरम्यान केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे 'किसान ट्रेन' लवकरच सुरु करीत आहे. शिवाय कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे," अशी माहिती दिली.
तसेच , धान उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच फळ उत्पादकांनाही या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे ही श्री.तोमर यांनी यावेळी सर्वांना आश्वस्त केले. केंद्र सरकारच्या भूमिकेचं शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केलं.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे , माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, शेतकरी नेते माजी आमदार पाशा पटेल, प्रगत शेतकरी डॉ.भगवानराव कापसे, चिकू बागायतदार संघाचे रघुनाथ बारी, द्राक्ष बागायतदार सोपान कांचन, माजी आमदार आंबा उत्पादक अजित गोगटे आणि आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष विवेक भिडे सहभागी झाले होते.