ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण
Mar 27, 2020, 18:58 IST
लंडन - ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स पाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढलं आहे.पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत कळवले आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार आहे”.
पण करोना झाला कसा?Over the last 24 hours I have developed mild symptoms and tested positive for coronavirus.
— Boris Johnson #StayHomeSaveLives (@BorisJohnson) March 27, 2020
I am now self-isolating, but I will continue to lead the government’s response via video-conference as we fight this virus.
Together we will beat this. #StayHomeSaveLives pic.twitter.com/9Te6aFP0Ri
मात्र बोरिस यांना करोना कसा झाला यासंदर्भातील प्रश्न अनेकांनी त्यांना ट्विटवर विचारले. यावर चांगलीच चर्चा ही रंगली. मात्र बोरिस यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. एका करोनाग्रस्त रुग्णाशी हस्तांदोलन केल्याने आपल्याला करोना झाला आहे, अशी शक्यता बोरिस यांनी बोलून दाखवली. “मला लोकांशी हस्तांदोलन करण्याची सवय आहे. मी अनेकांशी हात मिळवतो. काल रात्र मी एका रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा तेथील काही रुग्णांशी मी हस्तांदोलन केलं. त्यापैकी काहीजण करोनाचे रुग्ण होते,” असं बोरिस यांनी सांगितलं होते. त्यामुळे हे असं हस्तांदोलन केल्यानेच बोरिस यांना करोना झाल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. बोरिस यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी करोनाग्रस्तांशी हस्तांदोलन केल्याची कबुली देणारा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
यापूर्वी कोरोनाच्या महामारीचा फटका ब्रिटन राजघराण्याला देखील बसला आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. ते आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. करोनाने आतापर्यंत जगभरात २१ हजार जणांचा जीव घेतला असून करोनाची लागण झालेल्या अनेक मोठ्या नेत्यांमध्ये आता बोरिस जॉन्सन यांचा समावेश झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य प्रिन्स चार्ल्स यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांना हलकी लक्षणं दिसत आहेत, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ हजार लोकांना करोनाची लागण झाली असून ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रवास करणाऱ्याकडे पूर्ण तपशील मागितला जात आहे. याशिवाय रस्त्यांवर लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी एअरक्राफ्टचा वापर केला जात आहे.