डेंग्यूचा प्रतिबंध असा करा ...

 
s

डेग्यू प्रतिरोध महिना जुलै-2021 या महिन्यात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हयातील सर्व गावात आणि शहरी भागात एक दिवस एक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये पाऊस सुरु होतो. पावसाचा जून ते सप्टेबर हा काळ हिवताप आणि इतर कीटकजन्य आजारासाठी पारेषण काळ आहे.या काळामध्ये डबके, नाल्या, खडडे इत्यादी ठिकाणी पाणी साचते.डासोत्पत्ती होते. पर्यायाने कीटकजन्य आजार वाढतात.त्या अनुषंगाने लोकामध्ये जनजागृती व्हावी,डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. तसेच कीटकजन्य आजारापासून आपले कसे संरक्षण करावे इत्यादी माहिती या डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै 2021 अंतर्गत प्रत्येक वर्षी आरोग्य खात्या मार्फत राबवल जातो.

     कीटकजन्य आजारामध्ये डासापासून होणाऱ्या आजारांमध्ये प्रामुख्याने हिवताप,डेग्यु,चिकुनगुनीया,हत्तीरोग इत्यादी आजाराचा समावेश होतो. या सर्व आजारांचा प्रसार डासांच्या मादीमार्फत पसरविला जातो.डेंग्यू या आजाराचा प्रसार एडीस इजिप्ती डासांच्या मादी मार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. उदा: रांजण, माढ हौद आदी.

डेंग्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? 

डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे.

डेंग्यू कसा पसरतो? 

डेंग्यूचा विषाणू एडिस डासाच्या मादीमुळे पसरतो.

 डेंग्यूची लक्षणे

-तीव्र ताप,डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळयाच्या खोबणीमध्ये दुखणे,अंगावर लालसर रॅश/पुरळ, तीव्र पोटदुखी. 

तपासणी:- डेंग्यू तापाचे लक्षणे असलेल्या रुग्णांचे रक्त जल नमुने सेंटीनल सेंटर येथे तपासणी करुन निदान करता येते. तपासणी मध्ये डेंग्यू दुषीत रुग्ण आढळून आल्यास त्या भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अबेट कार्यवाही व आवश्यकतेनुसार धूर फवारणी करण्यात येते.

डेंग्यूवरील उपाय-डेंग्यूवर कोणताही ठोस नेमका उपचार नाही.तापासाठी पॅरासिटामोल.भरपूर पाणी पिणे.विश्रांती.लक्षणानुसार उपचार.

    कीटकजन्य आजाराच्या प्रतिबंधा करीता-परिसर स्वच्छता -घराभोवती /परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देऊ नये. त्या नष्ट कराव्यात. खराब टायर्स पंक्चर्स करावेत.पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पध्दतीने रचावेत.पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. झाकण नसल्यास जुन्या कपडयाने झाकावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत. तसेच अंडयाची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही.घरावरील टाक्यांना झाकणे बसवावी.शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे.आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे. या दिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून घ्यावीत. परिसरातील डबकी वाहती करणे, बुजविणे, मोठया डबक्यात गप्पीमासे सोडणे. जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत. उदा. सिमेंटचे कंटेनर अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळीनाशकाचा वापर करावा.

डास अळी आढळलेल्या पाणी साठयाचे काय करावे ?

पाणी साठे मोकळे करावेत, परंतु ते पाणी गटारात न ओतता जमिनीवर ओतावे.पाणी साठा मोकळा करणे शक्य नसल्यास त्यात अळीनाशकाचा वापर करावा.पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास पाणी गाळून घेऊन ते पाणी पुन्हा वापरावे तत्पुर्वी ते भांडे स्वच्छ फडक्याने घासून पुसून ठेवावे.

तापामध्ये अजून काय काळजी घ्यावी ?

कोणताही ताप अंगावर काढू नका. रक्ताची तपासणी करुन घ्या. हिवतापाची तपासणी प्रत्येक सरकारी दवाखान्यात मोफत होते आणि उपचारही मोफत दिला जातो. तापामध्ये कोणत्याही गोळया स्वतःच्या मनाने अथवा औषध दुकानदाराच्या सल्ल्याने घेऊ नये. अॅस्पिरिन, ब्रुफेन अशा गोळयांमुळे डेंग्यू तापात रक्तस्त्रावाची भिती असते.

From around the web