कोजागरी पौर्णिमेला भरणारी तुळजापूरची यात्रा रद्द : भाविकांत नाराजी

राज्यासह जिल्हा सीमा भक्तांसाठी राहणार बंद
 
d

 तुळजापूर -  महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे मंदिर नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी खुले करण्यात आले, पण कोजागरी पौर्णिमेला भरणारी तुळजापूरची यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांत मोठी नाराजी आहे.  कोजागरी पौर्णिमेला सोलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणाहून भाविक चालत येवून देवीचे दर्शन घेत होते, पण कोरोना संसर्ग आला आणि ही प्रथा दोन वर्षांपासून बंद पडली आहे. 

 कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आश्विन पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करत सोमवार (दि. १८) ते बुधवार (दि. २०) कालावधीत जिल्हा बंदी लागू केली आहे. या कालावधीत जिल्हा बाहेरील भक्तांना प्रवेश बंदही करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून आश्विन पोर्णिमेचा पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापूर कडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. दरम्यान पौर्णिमा कालावधीत तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील व्यवहार सुरळीत राहणार असून तुळजाभवानी मंदिरात सर्व धार्मिक विधी परंपरे प्रमाणे होणार आहेत. यात स्थानिक पुजारी, महंतांसह काही भक्तांनाही सहभागी हाेता येणार आहे. मात्र, जिल्ह्यातील भक्तांसह इतर सर्व भक्तांना या काळात देवीचे दर्शन मिळणार नाही.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची वर्षातील सर्वात मोठी यात्रा आश्विन पौर्णिमा यात्रा मंगळवार (दि. १९) व बुधवार (दि. २०) या कालावधीत साजरी करण्यात येत आहे. त्यासाठी लाखाे भाविक येऊन दर्शनही घेतात. ही गर्दी टाळण्यासाठी यंदा ही यात्राच रद्द केली आहे. मात्र, भक्तांची गर्दी होणार आहे. याची जाणीव पोलिसांना असल्याने भक्तांना तुळजापुरात येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. 

नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची संधी जिल्ह्यासह परराज्यातील भाविकांना ही मिळाली होती. मात्र, आश्विन पौर्णिमेला म्हणजेच कोजागरी पौर्णिमेला भरणारी यंदाची यात्रा रद्द करण्यात आल्याने केवळ तुळजापुरातील काही भक्तांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे यात्रा रद्द असली तरी, भाविक येणार असल्याचा अंदाज घेऊन पोलिसांनी राज्य सीमा, जिल्हा सीमा आणि शहराच्या हद्दीतील सीमेवरही चेक पोस्ट लावून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. 


शहरातील सर्व व्यवहार सुरळीत: जिल्हा बंदी कालावधीत जिल्ह्याबाहेरील लोकांना बंदी असली तरी तुळजापुरातील व्यवहार सुरळीत असणार आहे. तुळजाभवानी मंदिर सुरू राहणार असून मंदिरातील सर्वच धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडणार आहेत.


कोरोनाचे नियम पुजारी, महंतांनाही

नवरात्रोत्सवात ज्याप्रमाणे भक्तांना दोन लस घेणे आवश्यक होते. तसेच यावेळी स्थानिक भक्तांसाठी हा नियम कायम राहणार आहे. यात भक्तांसह मंदिरातील पुजारी, महंत यांनाही लागू असणार आहे. ज्यांनी दोन लस घेतल्या, मास्क लावलेले आहे. अशांनाच मंदिरात प्रवेश असणार आहे. त्याच बरोबर भक्तांची टेम्परेचर गनने तपासणी होणार आहे. त्याच बरोबर दहा वर्षाखालील बालक, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांसह ज्यांना दुर्धर आजार आहे, अशा भक्तांनाही प्रवेश बंद असणार आहे.

From around the web