चिंताजनक : बावी येथे ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले 

नागरिकांनी दक्षता घेण्याचे  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन
 
corona

उस्मानाबाद -  जिल्हयामध्ये कोविड-19 च्या ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन रूग्ण बावी (ता.उस्मानाबाद) येथील आहेत.या गावात प्रतिबंधात्मका उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून स्वत:चा बचाव करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

          कोविड-19 च्या नवीन ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याचे दिसून येत आहे.त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोविड-19 च्या प्रादूर्भावामध्ये वाढ होऊ नये यासाठी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रभावीपणे पालन होणे आवश्यक आहे.त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनी घाबरून न जाता कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे,नियमितपणे मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे,असेही आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

          जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व जिल्हयातील शासकीय ,निमशासकीय कार्यालयामध्ये नो मास्क नो एन्ट्री तसेच नो व्हॅक्सीन नो एन्ट्री मोहिम राबविण्यात येत आहे.मास्क घातलेला असल्या शिवाय तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे

From around the web