महिलांनी सक्षम आणि सशक्त होण्यासाठी विधी साक्षर होण्याची गरज

- पोलीस अधीक्षक नीवा जैन
 
ss

उस्मानाबाद -  महिलांनी स्वःताला  सक्षम आणि सशक्त करण्यासाठी त्यांनी न्याय आणि विधी अर्थात कायद्याबाबत साक्षर होण्याची आवश्यकता  आहे . यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या शिबिरांचा यासाठी नक्की उपयोग होईल असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी आज येथे केले.  जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत “आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले , महाराष्ट्र व गोवा अधिवक्ता परिषदेचे सदस्य मिलिंद पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर वसंत यादव, जिल्ह महिला व बालविकास अधिकारी बी.एम निपाणीकर,जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले, विधी मंडळाचे विधीज्ञ पी.एन लोमटे, तानाजी चौधरी, एम बी माडेकर, डॉ.बापूजी साळूंके विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी,आशा वर्कर आदि उपस्थित होते.

आपल्या संस्कृतीमध्ये जे-जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागाने साध्य झालेले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनी जास्त प्रमाणात केली आहे, परंतु हे घडत असताना स्त्रियांवर अन्याय झाला आहे. कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक मूल्य-संवर्धनासाठी स्त्रियांनीच मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे. महिलांवर अत्याचार झाल्याचे ब-याचवेळी निदर्शनास येत नाही, कारण स्त्रिया जोपर्यंत अतिरेक होत नाही तोपर्यंत शांत राहतात, आणि त्यांच्या या सहनशक्तीमुळे अत्याचार करण-यांची हिंम्मत वाढते, अनेकवेळी महिलांना हुंडा,वारसाहक्क, आणि मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून मानसिक आणि शारिरिक इजा देण्यात येते. कौटुंबिक हिंसाचार,सामजिक हिंसाचार, शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या या विषयांवर महिलांनी एकमेकांना जगरुक केले पाहिजे,यासंदर्भात आशा वर्कर त्यांच्या ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांशी थेट संवाद साधून मोलाची भूमिका अदा करू शकतात. असेही श्रीमती जैन यावेळी म्हणाल्या.

अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी  मुलींप्रमाणे मुलांनाही चांगले संस्कार देण्यावर जोर दिला. त्या म्हणाल्या जगातील निम्मी लोकसंख्या असणारा महिला वर्गाला प्रत्येक ठिकाणी संधी मिळाली तर ते पुरुषांसारखेच काम करू शकतात अशी अनेक उदाहरणे जगासमोर आहेत.आजचा हा महिला सबलीकरण कार्यक्रम महिलांसाठी विधी साक्षरता मोहीम आहे.आपण सर्व येथे महिलांच्या सशक्तीकरणाच्या हेतूने विचारमंथन करण्यासाठी उपस्थित आहोत,संविधानाने स्त्रियांना समान अधिकार दिलेले आहेत. याबाबत महिलांमध्ये जगरुक्ता निर्माण करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाची दारे आपल्यासाठी अतिशय उपयुक्त पर्याय आहे. महिलांनी सुशिक्षित होऊन आपल्या अधिकारांचे रक्षण करावे. कारण एक पुरुष शिकला तर तो स्वत: समृद्ध होतो परंतू जर एक महिला शिकली तर संपूर्ण कुटूंब समृद्ध होते असेही श्रीमती आवले यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्र व गोवा अधिवक्ता परिषदेचे सदस्य मिलिंद पाटील, महिला सक्षमीकरण आत्मसात करण्यासाठी स्त्रीयांनी स्वत:पासूनच सुरुवात करावी. महिलांवर होणा-या अत्याचारांच्या अधिकांश घटना हे कौटुंबिक हिंसेवर आधारित असतात.त्यामुळे सासूने सूनेला मुलगीप्रमाणे आणि सूनेने सासूला आईप्रमाणे वागणुक देणे आवश्यक असते . लोकांना अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच कायद्याचे विषय शिकवणेही गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय महिलांचे योगदान मोलाचे आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली उपस्थिती सिध्द केली आहे. आर्मी,नेव्ही आणि एअर फोर्स सारख्या सैंन्यदलातही त्यांनी आपल्या कारकीर्दबद्दल ठसा उमटवला आहे. असेही श्री.पाटील यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर वसंत यादव यांनी “आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत” विधी साक्षरता मोहिमेबाबत माहिती विषद केली.ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना समान अधिकार दिला आहे.समान हक्क,समान वेतन,मतदानाचा अधिकार लिंगभेद विरोधी कायदा,स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा,सतीप्रथा विरोधी कायदा,महिलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आरक्षण अशा अनेक कायदे आणि महिला उद्धारासाठी योजना राबविल्या जात आहेत. तथापि, आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी महिलांविरोधात अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येतात. अनेक पीडित महिला शिक्षण,माहिती आणि पैशांअभावी आपले म्हणने न्यायालयात मांडण्यास सक्षम नसतात, त्यांच्या मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  दार नेहमी उघडे राहणार , तसेच निराधारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असेही श्री. यादव म्हणाले.

यावेळी श्री. निपाणीकर यांनी महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती दिली .जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले, विधी मंडळाचे विधीज्ञ पी.एन लोमटे, तानाजी चौधरी, एम बी माडेकर यांनीही मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बापूजी साळूंके  आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी समाधान शेळके यांनी केले . आभार  विद्यार्थिनी द्वारका देवळे यांनी मानले .     

From around the web