शिवसेनेचे खासदार,आमदार शेकडो लोक मेल्यावर मदत करणार का ?
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, शिवसेनेचे खासदार आणि आमदार फोटो शूट करून पब्लिसिस्टी स्टंट करीत आहेत, अशी खरमरीत टीका मनसेने केली आहे.
जिल्हात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु असून दररोज २० ते २५ रूग्ण मृत्यू पावत आहेत. जिल्ह्यात एक्टीव्ह रुग्णाची संख्या सहा हजार पर्यंत गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय, खाजगी रुग्णालये तुडूंब भरली असून ऑक्सिजन,बेड, व्हेंटिलेटर सह अन्य सोयी-सुविधांची कमतरता भासत आहे. ठिकठिकाणची औषध दुकाने फिरूनही रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळणे मुश्कील झाले आहे.
तोकड्या आरोग्य सुविधेमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला असून कोरोनाग्रस्त रूग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरासह आरोग्य कर्मचारी व नातेवाईकांचे शर्थीने प्रयत्न करत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना शिवसेनेचे खासदार -आमदार रेमडेसिव्हिर,इंजेक्शन ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,बेड वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत, फक्त फोटो शूट काढण्यात मग्न आहेत.
लोकांचे जीव वाचवण्यासाठी सत्तेचा उपयोग करून सरकारवर दबाव आणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात यावा तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा असेही मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी म्हटले आहे.