संशयास्पद टाटा सफारी गाडीत नेमकं दडलंय काय ? 

तुळजापूर पोलिसांचा आणखी एक कारनामा उघडकीस 
 
संशयास्पद टाटा सफारी गाडीत नेमकं दडलंय काय ?

तुळजापूर  -  तुळजापूर पोलिसांचा आणखी एक कारनामा  उघडकीस आला आहे. तुळजापूर शहरात शुक्रवारी दुपारी पकडण्यात आलेली एक संशयास्पद टाटा सफारी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. या गाडीत दोन संशयास्पद पोती होती. चालकाबरोबर 'डील' करून ही  गाडी रात्री उशिरा गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन असताना, शुक्रवारी दुपारी  ( दि. १४ मे  ) एक टाटा सफारी गाडी ( क्र. MH 44,G.1071 ) तुळजापूर शहरात पकडण्यात आली, नंतर ही  गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली, त्यात दोन संशयास्पद पोती  होती.   ही  टाटा सफारी गाडी रात्री उशिरा  'डील' करून सोडून देण्यात आली.

या टाटा सफारी गाडीत गांजा होता की  गुटखा  हे अद्याप कळू शकलेले नाही, मात्र ही  गाडी नेमकी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये का आणण्यात आली ? आणि नंतर गुन्हा दाखल न करता का सोडून देण्यात आली ? याची उलट - सुलट चर्चा तुळजापुरात सुरु आहे. 

संशयास्पद हालचाली 

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास टाटा सफारी गाडी ( क्र. MH 44,G.1071 ) शिवाजी चौकात पकडण्यात आली. त्यानंतर ही  गाडी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. नंतर अडीच वाजण्याच्या सुमारास  दोन पोलीस चालकाला घेऊन एका बँकेच्या एटीएममध्ये गेले. नंतर SK धाब्यावर गेले. नंतर पोलीस स्टेशनमध्ये आले आणि साहेबांबरोबर तोडपाणी  करून ही  गाडी गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आली. 

नळदुर्ग गांजा प्रकरणातील एक गाडी तुळजापूर पोलिसांनी सोडून दिली होती. त्यात काही पोलीस निलंबित झाले होते. त्याची शाई वाळते  न वाळते  तोच आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी पोलीस निरीक्षकांसह दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

From around the web