तुळजापूर तालुक्यातील खासगी डॉक्टरवर गावगुंडांचा हल्ला

- हल्ला करणार्या गावगुंडांवर त्वरीत कार्यवाही करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू
- अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
उस्मानाबाद - क्षुल्लक कारणावरुन तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील खासगी डॉ. अभिजित जैन आणि त्यांच्या परिवारावर काही गावगुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात गुंडांनी दवाखान्याच्या तोडफोडीसह डॉ. जैन यांची पत्नीचा विनयभंग आणि मुलीलाही मारहाण केली. या हल्ल्यातील गावगुंडांना पोलीसांनीत त्वरीत पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी २४ ऑगष्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातुन दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, वैद्यकिय क्षेत्रात आपले प्राण पणाला लावून रुग्णांचा जीव वाचविणार्या डॉक्टरांवर महाराष्ट्र सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यामुळे वैद्यकिय क्षेत्र भयभित झाले आहे. डॉक्टरांवर हल्ल्यासंदर्भात शासनाने कठोर कायदे केले आहेत. मात्र अनेक घटनांमध्ये पोलीस प्रशासन डॉक्टरांवरील हल्ल्याची गंभीर दखल घेत नाहीत व आरोपींना पाठीशी घालत आहेत. या हल्ल्याच्या घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या सन्मानाला काळीमा फासणार्या असून सत्ताधारी सरकारचे अपयश अधोरेखीत करणार्या आहेत.
२३ ऑगष्टच्या रात्री तुळजापूर तालुक्यातील ग्राम काक्रंबा येथील बीएएमएस डॉ. अभिजित जैन यांच्यावर गावातील गावगुंडांनी क्षुल्लक कारणावरुन हल्ला केला. या हल्ल्यात गावगुंडांनी त्यांच्या दवाखान्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. एवढेच नव्हे तर गावगुंडांनी त्यांच्या पत्नी व चिमुकल्या मुलीलाही मारहाण करुन पत्नीचा विनयभंग केला आहे.
या प्रकरणाची फिर्याद जैन यांनी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता केवळ अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली आहे. त्यामुळे आरोपी उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत. सदर गुन्ह्यातील अण्णासाहेब माने, सोपान कोकरे व एकनाथ म्हेत्रे हे आरोपी हिस्ट्रीशिटर असून त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
या हल्ल्यामुळे जैन दाम्पत्य प्रचंड दहशतीत आले असून त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तरी पोलीसांनी या गावगुंडांना त्वरीत पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व डॉ. जैन यांच्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे. अन्यथा असोसिएशनच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. हिवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे दिला आहे.