कोळेवाडी गावात अफेवेमुळे लसीकरणाला ब्रेक 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या  जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यानेच पसरवली अफवा
 
c

उस्मानाबाद - राज्यात अनेक ठिकाणी एकीकडे कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला असताना, उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी गावात एका अफवेमुळे लोक लसीकरण करून घेत नसल्याचे समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे ही अफवा एका जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यानेच पसरावून शासनाच्या महत्वकांशी कार्यक्रमाला हरताळ फसला आहे. 


.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातही केली आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अग्रेसर आहेत. स्वत: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे फिल्डवर जाऊन लसीबाबत जनजागृती करत आहेत. 

मात्र, त्यांच्याच अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी बेजबाबदारपणा करत आहेत. कनिष्ठ सहाय्यक विकास भीमराव आकोसकर यांनी कोळेवाडी येथील एका स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट फाॅरवर्ड केली आहे. यामध्ये एक बातमी असून ‘कोरोना व्हॅक्सिन घेणारे लोक दोन वर्षात मरणार – लुन माॅर्न्ट ‘ असा मथळा आहे. प्रत्यक्ष आरोग्य विभागात मुख्य कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पोस्ट फॉरवर्ड केल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आटापिटा करत आहे. आरोग्य कर्मचारी लसीकरण होण्यासाठी सातत्याने घाम गाळत आहेत. मात्र, त्याच आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याने लस घेतल्यानंतर मृत्यू होत असल्याची पोस्ट एका स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

ग्रुपवरील मेसेसमुळे कोळेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे लसीकरणाचा प्रतिसाद कमी झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागानेच असा कोणताही प्रकार होत नसून लसीकरण पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे

याप्रकरणी कोळेवाडी  ग्रामपंचायतीने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार गावात कोणीही लस घेण्यासाठी धजावत नाही. गावात केवळ १५० ते २०० लोकांनीच लस घेतली आहे. लसीकरणाबाबत अशी अफवा पसरवणाऱ्याला तातडीने बडतर्फ करून कठोर शासन करावे व गावात प्रबोधन करण्याची मागणी निवेदनात केली आहे. यावर सरपंच शिला अकोसकर, उपसरपंच रघुवीर राऊत, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खोत, महादेव शिंदे, प्रकाश आदटराव, दादासाहेब आकोसकर, श्रीकृष्ण खोत, शिवाजी आकोसकर यांच्या सह्या आहेत.


अन्य ठिकाणीही घडले प्रकार
लसीकरणाबाबत सर्वच ठिकाणी अफवा आहेत. अशा प्रकारच्या बातमीची पोस्ट अन्या ठिकाणी सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. यामुळे अनेकजण लस घेण्याकडे पाठ फिरवत आहेत. जबाबदार अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने अशी पोस्ट टाकली तर याचा प्रभाव अधिक होतो.

कोळेवाडी गावातील नागरिक लस घेण्यास घाबरत आहेत. गेल्या महिन्यात अकोसकर यांनी व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकली होती. ती पोस्ट लोक आता दाखवून भीती व्यक्त करत आहेत. गावात आयोजित एकमेव लस सत्रात लोकांना बळजबरीने न्यावे लागले. येथे प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे.
- रघुवीर राऊत, उपसरपंच , कोळेवाडी.

उस्मानाबाद लाइव्हचे आवाहन

काेरोनापासून संरक्षणासाठी केवळ लस व मास्क हाच प्रभावी उपाय आहे. लस घेतल्याने कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा अनेकांनी दिला आहे. स्वत: पंतप्रधान, तसेच अन्य देशांचे प्रमुख, अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांनीही लस घेतली आहे. संशोधनानंतर लस तयार होते. कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लसी सर्व कसोट्यांवर खऱ्या उतरल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता लसी घ्यावी तसेच घराबाहेर पडताना मास्कचा उपयोग करावा.


लसीकरणाबाबत माहिती

  • 17 गावे जागजी पीएचसी अंतर्गत.
  • 3425 लाेकांना पहिला डोस.
  • 1743 जणांना दिला दुसरा डोस.
  • 54 लोकांना कोळेवाडीत पहिला डोस.
  • 47 कोळेवाडीत दुसरा डोस घेतलेले.
  • 1241 नागरिकांना लस देणे अपेक्षित.
  • 1231 लसीसाठी कोळेवडीत अक्षित लाभार्थी.

From around the web