नळदुर्गजवळील पाटील तांड्यावर हजारो लिटर गावठी दारूचे गाळप
नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्यावरील पाटील तांड्यावर हजारो लिटर अवैध दारू गाळप होत असताना, नळदुर्ग पोलीस मूग गिळून गप्प आहेत. दारू गाळप करणाऱ्यांशी नळदुर्ग पोलिसांचे लागेबांधे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अक्कलकोट रस्त्यावरील पाटील तांड्यावर दररोज हजारो लिटर अवैध दारू गाळप होत आहे. येथील गावठी दारू रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास अणदूर, नळदुर्ग, इटकळ , जळकोट परिसरातील किरकोळ विक्रेत्याना पुरवली जाते. या किरकोळ विक्रेत्याकडून दरमहा पाच ते दहा हजार हप्ता सुरु आहे.
गावठी दारू पिऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असले तरी पोलिसांचे संसार मात्र फुलले आहेत. अणदूरमध्ये तर गावठी दारूचा महापूर सुरु आहे. धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने अणदूरमध्ये तीन ठिकाणी कारवाई केली, पण पुन्हा जेसे थे परिस्थिती आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कारवाई करण्यासाठी गेले असता, नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील घरका भेदीवाले पोलीस दारू विक्रेत्याना अलर्ट राहण्यासाठी अगोदरच खबर देतात,त्यामुळे दारू विक्रेते त्या दिवशी फरार होतात.
नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि म्हणून सिध्देश्वर गोरे आल्यापासून दारू, मटका, जुगार , गुटखा विक्री जोरात सुरु आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी गोरे यांच्यावर कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.