नापिकीला कंटाळून तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
कळंब - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ पाचवीला पुजला आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाने गुंगारा दिल्याने कळंब तालुक्यातील निपाणी शिवारातील सोयाबीन कोमजले आहे. त्यामुळे निराश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील व्हिडीओ शेयर करीत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
नापिकीला कंटाळून कळंब तालुक्यातील निपाणी गावच्या तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अशोक गुंड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने आठ दिवसांपूर्वी आपल्या शेतातील वाळत असलेल्या सोयाबीनचा व्हिडीओ काढून समाज माध्यमात शेअर करत व्यथा मांडली होती.
शेतातील सोयाबीनचा पूर्णपणे धुरळा झाला असून प्रशासन आणि विमा कंपनीने याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केलं होतं.त्यानंतर त्याने काल सायंकाळी विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हा शेतकरी अस्वस्थच होता असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरली असून पुन्हा एकदा मराठवाड्यात नापिकीचे संकट तोंड वर काढताना दिसत आहे. शिराढोण पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.