उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला 

 मतदान १५ जानेवारी तर निकाल १८ जानेवारी रोजी 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.  मतदान १५ जानेवारी तर निकाल १८ जानेवारी रोजी  होणार आहे. दरम्यान, सरपंच आरक्षणाची सोडत १८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. 

 एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होत्या. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. 

कळंब तालुक्यात धुराळा उडणार 

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या १८८ प्रभागातील ४९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.  तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत सप्टेंबर महिन्यात संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

 तालुक्यातील ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहावयास मिळतो की काय अशी शक्यता आहे. आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रापंचायत ताब्यात ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांसह राजकीय लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागणार आहे. सत्तेचा बालेकिल्ला राखण्यासाठी आतापासून गावपुढाऱ्यांना वेध लागले आहे. त्यामुळे आता प्रशासक जाऊन गावाला सरपंच मिळणार असून तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सात डिसेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे. 
 

From around the web