उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ केंद्रावर मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस 

 
s

उस्मानाबाद -   ४५ वर्षाच्या पुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर यांना फक्त कोव्हॅक्सिन लसीचा‌ दुसरा डोस दि.१ जून रोजी जिल्ह्यातील १ हजार ७०० जणांना १४ आरोग्य केंद्रावर  देण्यात येणार आहे.

४५ वर्षाच्या पुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर यांना फक्त कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा शासकीय रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी देण्यात येणार आहेत. 

ज्या लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन किमान २८ दिवस पूर्ण झालेले आहेत. केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदविलेले ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार असून या दिवशी फक्त कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे या व्यतिरिक्त इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लसीकरण केले जाणाऱ्या केंद्राची नावे व उपलब्ध लसींची संख्या पुढील प्रमाणे - नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, उस्मानाबाद (फक्त फ्रन्टलाईन वर्करसाठी)  (१५०), नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर, उस्मानाबाद (१५०), ग्रामीण रुग्णालय मुरुम, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, व ग्रामीण रुग्णालय भूम या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी (२५०), तर उपजिल्हा रुग्णालय उमरगा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय कळम व उपजिल्हा रुग्णालय परंडा या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी (४००), तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या लसीकरण केंद्रावर (३००) व जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद या लसीकरण केंद्रावर (४००) अशा एकूण १ हजार ७०० लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
 सदरील लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हे लसीकरण सत्र सर्व तालुक्यामधून राबविले जाणार असल्यामुळे शक्यतो लाभार्थ्यांनी ज्या तालुक्यांमध्ये अथवा रुग्णालयामध्ये पहिला डोस घेतला होता. त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दी होणार नाही. तसेच लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही.  लसीकरण सत्र आयोजित चार केंद्रावर  दर्शविल्याप्रमाणे लाभार्थी संख्ये एवढे कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. 

लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी लसीकरण केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. यापूर्वी जर वरीलपैकी लसीकरण केंद्रांमधून टोकण वाटप झालेले असल्यास ते रद्द समजण्यात येऊन दि. १ जून रोजी नव्याने टोकन वाटप केले जातील. संबंधित ठिकाणच्या ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्याबरोबरच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून लस घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ एच.व्ही. वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web