राज्यातील दुसरे केंद्रीय विद्यापीठ धाराशिवमध्ये सुरू करावे

आमदार रणाजगजितसिंह पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी
 
rana

धाराशिव -  कमी खर्चासह उच्च दर्जाचे शिक्षण हे केंद्रीय विद्यापीठांचे ब्रीदवाक्य आहे. आकांक्षित जिल्हा असलेल्या धारशिवच्या शैक्षणिक गुणवत्तेला केंद्रीय विद्यापीठामुळे बळकटी मिळेल. राज्यातील दुसरे केंद्रीय विद्यापीठ धाराशिव येथे स्थापन करावे. त्यासाठी राज्यसरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आग्रही शिफारस करावी अशी मागणी आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

देशात एकूण 55 केंद्रीय विद्यापीठ आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ या एकमेव केंद्रीय विद्यापीठाचा समावेश आहेत. अगदी त्याच धर्तीवर राज्यातील दुसरे केंद्रीय विद्यापीठ धाराशिव येथे स्थापन करावे अशी मागणी आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी लावून धरली आहे.

पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील आकांक्षीत जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बळकटी देणे हा त्याचाच एक भाग आहे. त्याकरिता धाराशिव येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करणे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आग्रही शिफारस करावी विनंती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. तसा रीतसर प्रस्ताव राज्य शासनाकडे  पाठविण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करून औद्योगीकरणासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला भौगोलिक मर्यादा आहेत. त्यामुळे येथील शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी २००४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र धाराशिव येथे सुरू केले. उपकेंद्रासाठी खास बाब म्हणून एमआयडीसीची  ६० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. सध्या विद्यापीठ उपकेंद्रात २२ हजार ३९४ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण एकाच परिसरात मिळावे यासाठी मागील पंधरा वर्षांपासून जिल्हावासीय स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करीत आहेत.

जिल्ह्याची शैक्षणिक गरज, नागरिकांची आग्रही मागणी आणि आकांक्षित जिल्ह्यासाठीचा केंद्र सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेऊन धाराशिव येथे राज्यातील दुसरे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री ना. धर्मेंद्र प्रधानजी यांच्याकडे राज्य सरकारने शिफारस करावी अशी विनंती आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

From around the web