शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणार

-   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
s
पांगरदरवाडी येथील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

धाराशिव : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत जून 2024 पर्यंत पोहचेल यादृष्टीने जलसंपदा विभागाने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना आपण दिल्या आहेत. यामुळे मराठवाड्याच्या हिश्शाचे पाणी मराठवाड्यापर्यंत पोहोचेल व मराठवाड्यातील दुष्काळ दूर होऊन हा भाग सुजलाम-सुफलाम होईल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक दोन अंतर्गत विविध कामांची पाहणी व पंप गृह येथे यंत्र पूजन श्री. फडणवीस यांनी केले. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या विरोधात लढण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कार्यक्रमांपैकी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाड्याला पाण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले. परंतु आता मराठवाड्याच्या हिश्शाचे पाणी मराठवाड्याला मिळेलच, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

तहानलेल्या मराठवाड्याला पाणी तर मिळेलच. पण सोबतच पुढील टप्प्यात कृष्णा भीमा स्थिरीकरणातून पुराचे वाहून जाणारे पाणी कालव्यांच्या माध्यमातून वळवून उजनीत आणण्यात येईल. त्यातूनही मराठवाड्याला पाणी मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याबाबतचा प्रस्तावही जागतिक बँकेकडे सादर केला आहे. जागतिक बँकेने देखील या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठीही शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

सन 2014 ते 2019 या काळातच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सर्व कामांना मान्यता देण्यात आली होती, सर्व अडचणी दूर केल्या होत्या. बोगद्यांच्या कामाला सुरूवातही केली होती. परंतु पुढे या प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. ती आतापर्यंत प्रलंबित राहिली होती, शासनाने आता या प्रकल्पासाठी 11 हजार 726 कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली असल्याने कामे वेगाने पूर्णत्वाला जातील, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 24 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार, असल्याचेही ते म्हणाले.

आई तुळजाभवानीकडे प्रार्थना

आई तुळजाभवानी ही शक्तीची देवता आहे त्यामुळे दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, महिला आणि युवा या सगळ्यांच्या जीवनात चांगले सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्याची आम्हाला ताकत दे अशी आपण तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.

यावेळी कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्णत्वास नेत असल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार केला.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून मिळणारे पाणी प्रत्येकाचे जीवन बदलून टाकेल, असे श्री.पाटील म्हणाले.

From around the web