न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये

-अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे
 
dharashiv

धाराशिव -  शिंदे - फडणवीस सरकारने उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा  ठराव मंजूर केल्यानंतर या नामांतराला हरकत घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची आतापर्यंत पाच वेळा सुनावणी झाली आहे. न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत शासकीय कामकाजात धाराशिव उल्लेख न करता उस्मानाबाद उल्लेख करण्याचा निर्देश दिले आहेत, तरीही काही अधिकारी जाणीवपूर्वक धाराशिव करीत असल्याचे याचिकाकर्ते यांचे म्हणणे आहे. त्यावर न्यायालयाने सक्त ताकीद दिली आहे. 


उस्मानाबाद जिल्हयाचे नाव बदलून धाराशिव करण्याबाबत उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्रमांक १७३ / 20२२ दाखल असून नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागाशी संबंधित कार्यालये जिल्हयाचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते यांचे विधिज्ञांनी  न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्यावर  उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल न करणे बाबत निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023 व दि. 14 जून 2023 रोजीच्या आदेशाची प्रत संलग्न करून जिल्हयातील सर्व विभागप्रमुख व सर्व कार्यालय प्रमुख यांना याव्दारे आदेशीत करण्यात येते की, मा. उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023  व दि. 14 जून 2023 चे आदेशातील सुचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. मा. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये, उस्मानाबाद नावाचाच वापर करण्यात यावा. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी जारी केले आहे.
 

From around the web