मागणीप्रमाणे धान्य मिळाल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी

शालेय पोषण आहार योजनेबाबत डॉ.विजयकुमार फड यांचे आदेश
 
मागणीप्रमाणे धान्य मिळाल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी

 उस्मानाबाद - जिल्हयातील प्राथमिक विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शालेय पोषण आहार योजने अंतर्गतच्या तांदुळ व धान्याचा पुरवठा मागणीप्रमाणे पुरवठादाराकडून प्राप्त झाल्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारी ही, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी शिक्षण विभागांतर्गत बैठकीत उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना नुकतेच दिले.

   जिल्ह्यात काही शाळांवर पुरवठादांराकडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदुळ व धान्य कमी प्रमाणात आल्याबाबत प्रसार माध्यमामधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यानुषंगाने त्या बातम्यांची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून शालेय पोषण आहार आणि धान्याचे वजन करुन घेणे ही मुख्याध्यापकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

      शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 1538 जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी अनुदानीत शाळा आहेत.जिल्ह्यात एकूण एक लाख 73 हजार 654 एवढे लाभार्थी विद्यार्थी आहेत.त्यासाठी दरमहा सरासरी 442 एवढा मेट्रीक टन तांदुळ शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासनाकडून प्राप्त होतो.पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने मालाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात इलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे बंधनकारक आहे.

       मुख्याध्यापकाने माल उतरवून घेतांना वजन करुनच घेणे आणि जेवढे वजन भरेल तेवढीच पोच पावती देणे आवश्यक आहे. कंत्राटदाराकडून मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यास मुख्याध्यापकाने तसे वरिष्ठांना कळविणे अपेक्षीत आहे. सध्यःस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठीचा तांदुळ आणि धान्य आदी माल पालकांना शाळेकडून दिला जात आहे. तेंव्हा पालकांनीसुद्वा आपणांस प्राप्त झालेले धान्य हे ठरवून दिलेल्या प्रमाणातच आहे किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी.धान्य कमी असल्याचे दिसल्यावर मुख्याध्यापकाकडे तक्रार करावी,असे निर्देश शाळास्तरावर सर्व मुख्याध्यापकांना देण्याच्या सूचना डॉ. फड यांनी शिक्षण विभागातील उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना दिल्या.

  यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत,शिक्षणाधिकारी (प्राथमिक)डॉ.अरविंद मोहरे, लेखाधिकारी, श्री. सोनवणे, उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे, अधीक्षक सुरेश वाघमारे,श्री.कथले हे उपस्थित होते.                       

From around the web