उस्मानाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी
कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे कोरोनाने हाहाकार माजवला असताना दुसरीकडे कोरोना रुग्णाला म्युकरमायकोसिसचा लागण होत असल्याचे समोर आले आहे. या आजारामुळे जिल्ह्यात दोघांचा बळी गेला असून, प्रशासन अश्या रुग्णाची माहिती लपवत असल्याचे समोर आले आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी अर्जुन उत्तरेश्वर लाकाळ ( रा. पळसप ) यांना काही दिवसापूर्वी कोरोनाने ग्रासले होते.त्यातून ते बरे होत असताना डोळ्याला म्युकरमायकोसिसची लागण झाली. त्यामुळे त्यांना सोलापूरला हलवण्यात आले. सोलापूरला त्यांच्या डोळ्यावर ऑपरेशन करून एक डोळा काढण्यात आला पण त्यांची प्रकृती खालावल्याने दुर्देवी मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा हा पहिला बळी असून, जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णाचा म्युकरमायकोसिमुळे मृत्यू झाल्याचे समजते. प्रशासन याची माहिती देत नसून, यामुळे खळबळ उडाली आहे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय ?
म्युकरमायकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्याला सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. त्यासाठी चाचण्या व तपासण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनातून बरे होणा-या रुग्णांमध्ये आता जीवघेण्या म्युकरमायकोसिस या बुरशी इन्फेक्शनचा धोका वाढत आहे. चेह-याभोवतीच्या हाडाच्या पोकळीत म्युकरमायकोसिस आजार होतो. डोळे व मेंदूवर त्याचा परिणाम होतो. कोरोना उपचारादरम्यान साईड इफेक्टमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होतो. त्यावर उपचार करण्यासाठी फोटेरिसीन बी या इंजेक्शन वापराने इलाज होतो. त्यामुळे आतापासूनच सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
यासंदर्भात महाराष्ट्रातील आरोग्य शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, हे रुग्ण कोरोनातून बरे होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असल्याने अनेक रुग्णांवर फंगल इन्फेक्शन होत आहे. हा आजार नवा नाही. परंतु कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना याची लागण होणे चिंताजनक आहे. स्टेरॉईडच्या अतिवापरातून शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत आहे, तर काही औषधी शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करत आहेत. अशा रुग्णांवर सहजगत्या फंगल इन्फेक्शन होते. असे संक्रमण झालेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी एका रुग्णाचा एक डोळा काढावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
म्युकरमायकोसिस या आजाराच्या निदानासाठी असलेले हे औषध खुप खर्चिक आहे. आज ज्याप्रमाणे कोरोनावर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्याचप्रमाणे या इंजेक्शनचा तुटवडा भविष्यात वाढू शकतो. त्यासाठी आताच नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
म्युकरमायकोसिस हा पर्यावरणातील एक भाग आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती याचा बळी ठरतात. अशा रुग्णांना डोकेदुखी, ताप, डोळ्याचा खालचा भाग दुखणे, नाक बंद होणे असे लक्षणे आढळून येतात. यावरील उपचार खूप महागडे आहेत. २१ दिवसांचा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो. त्यात एका इंजेक्शनची किंमत किमान ९ हजार रुपये आहे. हे लक्षात घेता केवळ इंजेक्शनचाच २ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई येथील केईएम रुग्णालयाचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. हेतल मरफतिया यांनी मागच्या दोन आठवड्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. येथे रोज दोन ते तीन रुग्ण दाखल होत आहेत, असे सांगितले.